झेंडूची लागवड करताय, जाणून घ्या फायदेशीर जाती | पुढारी

झेंडूची लागवड करताय, जाणून घ्या फायदेशीर जाती

झेंडू हे शोभेचे झुडूप कंपॉझिटी कुलातील टॅजेटस प्रजातीमधील आहे. सूर्यफूल, डेलिया वनस्पती याच कुलात समाविष्ट आहेत. टॅजेटस प्रजातीच्या काही जाती वर्षायू, तर काही बहुवर्षायू असून; त्या सर्व जातींना सामान्यपणे ‘मेरीगोल्ड’ म्हणतात. ही वनस्पती मूळची मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील असून, जगभर तिचा प्रसार झालेला आहे. भारतात या प्रजातीतील तीन जाती प्रामुख्याने आढळतात. टॅजेटस इरेक्टा, टॅजेटस पॅट्युला आणि टॅजेटस टेन्यूफोलिया.

भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत झेंडूची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. महाराष्ट्रात झेंडूची लागवड पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर, अकोला इत्यादी जिल्ह्यांतून कमी-जास्त प्रमाणात केली जाते.झेंडूचे झुडूप 1 ते 2.2 मी. उंच वाढते. पानांतील ग्रंथीमुळे त्यांना विशिष्ट प्रकारचा वास येतो. झेंडूचे फूल हे केवळ एकच फूल नसून, तो एक फुलोरा आहे.

फुले कोणत्या तरी एकाच ठळक रंगाची असून ती भडक पिवळी, नारिंगी किंवा क्वचित पांढरी असतात. फुलांना थोडा उग्र स्वरूपाचा वास असतो. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळ्या पुष्प रचनेमध्ये, बगिच्यांमध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते.

जाती : झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत. यातील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू. झेंडूच्या झाडाची उंची, झाडाची वाढीची सवय आणि फुलांचा आकार यावरून झेंडूच्या जातीचे हे प्रकार पडतात.हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी.

अ) आफ्रिकन झेंडू – या प्रकारातील झेंडूची झुडपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसाळी हंगामात झुडपे 100सें.मी. ते 150सें.मी.पर्यंत उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. या प्रकारात पांढरी फुले असलेली जातही विकसित करण्यात आली आहे. या प्रकारातील फुले मोठ्या प्रमाणात हारासाठी वापरली जातात.

उदा. पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, क्रॅकर जॅक, अलास्का, ऑरेंज ट्रेझन्ट,आफ्रिकन टॉल डबल मिक्स्डत, यलो सुप्रीम, गियाना गोल्ड, स्पॅन गोल्ड, हवाई, आफ्रिकन डबल ऑरेंज, सन जायंट, जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, बंगलोर लोकल, दिशी सनशाईन इत्यादी.

ब) फ्रेंच झेंडू – या प्रकारातील झेंडूची झुडपे उंचीला कमी असतात व झुडपासारखी वाढतात. झुडपाची उंची 30ते 40 सें.मी. असते. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलांचा गालिचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात.

उदा. पुसा अर्पिता, स्प्रे, फ्रेंच डबल मिक्स्डा, बटरबॉल, फ्लेश, यलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटल डेव्हिल, बायकलर, बटर स्कॉच, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, हार्मोनी, रॉयल बेंगाल, क्विन, सोफिया, इत्यादी.

क) संकरित जाती – बाजारामध्ये विविध संकरित जाती उपलब्ध आहेत.
उदा. पिटाईट, जिप्सी, रेड हेड, इन्का ऑरेंज, इन्का यलो, हार्मनी हायब्रीड, कलर मॅजिक, क्वीन सोफी, हार बेस्टमून इत्यादी.

प्रचलित जाती :

1) मखमली : ही जात बुटकी असून फुले लहान आकाराची असतात. या जातीची फुले दुरंगी असतात. ही जात कुंडीत लावण्यासाठी अथवा बागेच्या कडेने लावण्यासाठी चांगली आहे.

2) गेंदा : या जातीमध्ये पिवळा गेंदा आणि भगवा गेंदा असे दोन प्रकार आहेत. या जातीची झाडे मध्यम, उंच वाढतात. फुलांचा आकार मध्यम असून, हारासाठी या जातीच्या फुलांना चांगली मागणी असते.

3) गेंदा डबल : यामध्येही पिवळा आणि भगवा असे दोन प्रकार आहेत. या जातीची फुले आकाराने मोठी आणि संख्येने कमी असतात. कटफ्लॉवर म्हणून या जातीला चांगला वाव आहे.

4) पुसा नारंगी : या जातीस लागवडीनंतर 123-136 दिवसांनंतर फुले येतात. झुडुप 73 सें.मी.उंच वाढते व वाढदेखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व 7 ते 8 सें.मी. व्यासाची असतात.

5) पुसा बसंती : या जातीस 135 ते 145 दिवसांत फुले येतात. झुडूप 59 सें.मी. उंच व जोमदार वाढते. फुले पिवळ्या रंगाची असून 6 ते 9 सें.मी.व्यासाची असतात. प्रत्येक झुडूप सरासरी 58 फुले देते. कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य आहे.

6) एम.डी.यू.1 : झुडुपे मध्यम उंचीची असतात. उंची 65 सें.मी.पर्यंत वाढते. या झुडपास सरासरी 97 फुले येतात. फुलांचा रंग नारंगी असतो व 7 सें.मी. व्यासाची असतात.

– विनायक शिंदे

Back to top button