लाल मातीचा मानकरी आज ठरणार……..छत्रपती चषकासाठी रंगणार झुंजी!

लाल मातीचा मानकरी आज ठरणार……..छत्रपती चषकासाठी रंगणार झुंजी!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

वाडीया पार्कच्या आखाड्यामध्ये कुस्त्यांचा थरार रंगला असून शनिवार दि.28 मे ला सायंकाळी साडेचार वाजता अंतिम कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. या लढतींसाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील नामांकित मल्ल मैदानात उतरणार असून छत्रपती शिवराय कुस्ती चषकाचा महाराष्ट्राचा मानकरी कोण होणार याची उत्सुकता नगरकरांसह महाराष्ट्राला लागली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल 16.50 लाख रुपयांची रोख बक्षीसे देणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी ही राज्यातील मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मात्र या स्पर्धेपेक्षाही अनेक पटीने मोठ्या रकमांची रोख बक्षिसे किरण काळे युथ फाउंडेशन देत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात भव्य अशा कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांना मिळाला.

अंतिम सामन्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ पार पडणार असून यावेळी राज्य मंत्रिमंडळातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह सर्वपक्षीय दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेला पहिल्या दिवसापासूनच कुस्तीप्रेमींनी पसंती दिल्यामुळे कुस्त्या पाहण्यासाठी नगरकरांची गर्दी होत आहे.

शनिवारी सायंकाळी नामांकित मल्लांमध्ये अंतिम सामन्यांच्या चित्तथरारक कुस्त्या रंगणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, यावर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता महेंद्र गायकवाड, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू वेताळ शेळके, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू तुषार डूबे, युनिव्हर्सिटी चॅम्पियन शुभम काळे, महाराष्ट्र चॅम्पियन अतुल माने, राष्ट्रीय खेळाडू युवराज खोपडे यांच्यासह अनेक पुरुष नामवंत मल्ल मैदानात उतरणार आहेत.

आंतरराष्ट्रीय ख्यातीची पैलवान प्रतीक्षा बागडेसह सतरा वेळा आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवणारी कॉमनवेल्थ राष्ट्रकुल स्पर्धेची सुवर्णपदक विजेती महिला मल्ल रेश्मा माने ही देखील मैदानात उतरणार आहे. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती पैलवान रूपाली माने, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान तृप्ती जगदाळे, राज्यस्तरीय पैलवान सुप्रिया तुपे, राष्ट्रीय रौप्यपदक विजेती पैलवान कीर्ती पवार कुस्त्या रंगत आणणार आहेत.

रंगला चितपट कुस्त्यांचा थरार

स्पर्धेच्या उद्घाटनानंतर काल सकाळी ठिक 8.30 ते 10 या वेळेत पहिल्या सत्रात पुरूष ओपन गटातील पुरूष व महिलांच्या स्वतंत्रपणे कुस्त्या रंगल्या. तर पुन्हा सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत दुसर्‍या सत्रात कुस्त्या झाल्या. यात डाव, प्रतिडाव होऊन चितपट,थरारक लढतींनी कुस्तीप्रेमींच्या डोळयाचे पारणे फेडले. आज सकाळी सेमीफायनल, सायंकाळी फायनल रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news