मीनी ऑलिम्पिक स्पर्धा होणार पुण्यात; महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनच्या बैठकीत निर्णय | पुढारी

मीनी ऑलिम्पिक स्पर्धा होणार पुण्यात; महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनच्या बैठकीत निर्णय

पुणे: पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 च्या आयोजनास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे शहर आणि जिल्ह्यात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 32 विविध क्रीडा प्रकार असून, नऊ हजारांहून अधिक खेळाडू, अधिकारी पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर, अ‍ॅड. धनंजय भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप गंदे, संजय शेटे, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Cruise drug bust case | कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीनचिट

या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून राज्य शासनाने रुपये 19 कोटी 7 लक्ष 94 हजार एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्पर्धेच्या सुनियोजित व यशस्वी आयोजनासाठी समिती गठीत केल्या जाणार आहेत. राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या वतीने आयोजित होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये खेळल्या जाणाऱ्या 32 विविध क्रीडा प्रकारात होणार आहे.

या स्पर्धेचे यजमानपद हे पुणे जिल्ह्याला मिळाले असून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुगे-बालेवाडी हे स्पर्धेचे मुख्य ठिकाण आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या क्रीडा संकुलामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये जलक्रीडा प्रकारांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

पुणे : सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवर एफडीएचा छापा

जून रोजी सर्वसाधारण सभा

ऑलिम्पिक डे हा राज्यातील महसूल विभागस्तरावर तसेच जिल्हा स्तरावर महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपात साजरा करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18 जून रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Back to top button