विक्रीसाठी आणलेल्या तीन पहाडी पोपटांची आणि १२३ लव्हबर्ड्सची सुटका | पुढारी

विक्रीसाठी आणलेल्या तीन पहाडी पोपटांची आणि १२३ लव्हबर्ड्सची सुटका

पुणे : पुढारी वृत्तसेवा
बेकायदा तीन पहाडी पोपट हैदराबाद येथून विक्रीसाठी पुण्यात आणून जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले आहे.  त्याचबरोबर संबंधित आरोपीने जाळीच्या पिंजर्‍यात 123 बजरी जातीचे लव्हबर्ड निर्दयीपणे कोंबले होते. या पक्ष्यांना ताब्यात घेतले. वनविभाग तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने पक्ष्यांची सुटका केली.
 रास्ता पेठ भागात ही कारवाई करण्यात आल्याचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रहेमतुल्ला शौकतउल्ला खान (वय 57, रा. पेन्शनवाला मशिदीसमोर, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खान याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वनसंरक्षक काळूराम कड यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खान यांनी इमारतीच्या छतावर एका पिंजर्‍यात बजरी जातीचे 126 लव्हबर्ड आणि तीन पहाडी पोपटांना ठेवल्याची तक्रार वनसंरक्षक कड यांच्याकडे करण्यात आली होती. एकाच पिंजर्‍यात पक्ष्यांना कोंडल्याचे तक्रारदाराने सांगितले होते. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक आणि वनसंरक्षक कड यांनी कारवाई केली.
इमारतीच्या छतावरील पिंजर्‍यातून 123 लव्हबर्ड आणि तीन पहाडी पोपटांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेले पोपट आणि लव्हबर्ड बावधन येथील रेस्क्यू संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय थोरात, अजय जाधव, महेश बामगुडे यांनी ही कारवाई केली.

Back to top button