पुणे : सिंहगडावर ई-बससेवा पुन्हा सुरू होईपर्यंत गडावर खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार सिंहगडावर खासगी वाहनांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.
गडावर ई-बसला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वन आणि पीएमपी प्रशासनाला सोमवारी दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून ई-बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
सिंहगडावरील अरुंद रस्त्यामुळे बसच्या अपघातांचा होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन आणि नुकताच अपघात झालेल्या कठड्याची दुरुस्ती होईपर्यंत ई-बससेवा बंद असल्याने तात्पुरत्या स्वरूपात खासगी वाहनांना पुन्हा गडावर प्रवेश देण्यास मंगळवारपासूनच सुरुवात करण्यात आली आहे, असे पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.
गडावर जाणार्या रस्त्याचे रुंदीकरण, डागडुजी, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गाड्यांच्या संख्या वाढल्यानंतर सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.