

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर कोणत्याही प्रश्नांचे उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. तुम्ही म्हणजे मुंबई नाही, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. तुम्ही म्हणजेच मराठी माणूस आणि महाराष्ट्र, हा समज मनातून काढून टाका, असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्याही प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे टोमणे मारण्याचं एक उत्तम हत्यार आहे. युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत घ्यावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्री ठाकरे मनी लॉड्रींग प्रकरणी अटक केलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिकांचे सर्मथन कसे काय करू शकतात. त्यांचे समर्थन केल्याचे मला दु:ख झाले.
अफजलला फाशी देऊ नका, असे पत्र लिहणारे तुमच्यासोबत आहेत. तुमच्या काही घरगडींना ईडी बोलवते, म्हणून तुम्ही ईडीला घरगडी म्हणता का ? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला. आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आम्ही आरशासमोर उभे राहतो, असे प्रत्युत्तर त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. त्यांचे भाषण हे विधीमंडळातील नसून शिवाजी पार्कवरील होतं, असंच वाटलं. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली होती. मग त्यांचे समर्थन कसं काय करणार?असा सवालही फडणवीस यांनी केला.
युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत घ्यायला हवी होती, असा खोचक सल्ला देत मुख्यमंत्र्याकडे 'टोमणा' बॉम्ब अस एक वेगळं शस्त्र आहे. सत्तेसाठी तुम्ही कोणत्या शकुनीसोबत गेला आहात, असाही त्यांनी सवाल केला. कपटांनी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचलंत का ?