गणेश खळदकर
पुणे : नोकरीची हमखास शाश्वती समजल्या जाणार्या बीएड अभ्यासक्रमाकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून भावी गुरुजींनी पाठ फिरवली आहे. यंदा प्रवेशासाठी 32 हजार 290 जागांपैंकी केवळ 8 हजार 806 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे बीएड अभ्यासक्रमासाठी 'कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी' असे म्हणण्याची वेळ महाविद्यालयांवर आली आहे.
2012 पर्यंत बीएडची पदवी मिळताच तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळत होती. शिक्षकाची नोकरी मिळाली की हमखास आर्थिक स्थैर्य मिळत होते. त्यामुळे लाखो विद्यार्थी पदवी परीक्षा झाल्यानंतर लगेचच बीएडला प्रवेश घेण्यासाठी गर्दी करीत होते. परंतु, राज्यात 2012 पासून शिक्षकभरतीला बंदी घालण्यात आली. त्यामुळे बीएड करून नोकरीची संधी उपलब्ध होणे बंद झाले. तसेच, बीएडची पदवी मिळाल्यानंतरही टीईटी सक्तीची करण्यात आली. त्यानंतर शिक्षकभरतीसाठी 2017 साली टीईटीसह अभियोग्यता चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात 2019 मध्ये पुन्हा शिक्षकभरती सुरू करण्यात आली. परंतु, संबंधित शिक्षकभरतीत अत्यंत अल्पशा प्रमाणात शिक्षकांची पदे भरण्यात आली. जी प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. मात्र, गेल्या दहा ते अकरा वर्षांत लाखो उमेदवारांनी बीएड अभ्यासक्रमाची पदवी मिळवली आहे. ग्रामीण भागातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे शिक्षक आपली उपजीविका भागविण्यासाठी शिक्षकी पेशा सोडून दुसरीकडे नोकरी करीत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे लाखो बीएड उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांना अखेरची घरघर लागली असून, दरवर्षी महाविद्यालये तसेच विद्यार्थिसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. दरम्यान, 23 ते 26 फेब्रुवारी यादरम्यान बीएड प्रवेशासाठी आणखी एक फेरी घेण्यात येईल. यामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार असल्याची अपेक्षा सीईटी सेलच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
विधी प्रवेशाच्या तीन वर्षांसाठी 16 हजार 420 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 56 हजार 589 विद्यार्थी सीईटीच्या माध्यमातून पात्र झाले होते. परंतु, त्यातील केवळ 11 हजार 256 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून, 5 हजार 164 जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेशासाठी 11 फेब—ुवारीची अंतिम मुदत आहे, तर विधी पाच वर्षांसाठी 10 हजार 920 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 16 हजार 71 विद्यार्थी सीईटीच्या माध्यमातून पात्र झाले होते. परंतु, त्यातील केवळ 7 हजार 749 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून, प्रवेशाच्या अद्यापही 3 हजार 171 जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यामुळे विधी प्रवेशाला देखील विद्यार्थ्यांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.