सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थी हिताचा विचार करून आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सत्र परीक्षा ऑनलाईनच घेण्याचा अंतीम निर्णय झाला असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  विद्यापीठाच्या सत्र परीक्षा 15 फेब्रुवारीपासून ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळ तयारी करत होते. तर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परीषदेत किमान अंतीम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे विद्यापीठाकडून 21 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. परीक्षेसाठी साधारण साडेसहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून ऑनलाईन घेण्याचे निश्‍चित झाले होते. परंतु व्यवस्थापन परीषदेच्या काही सदस्यांनी किमान अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घ्यावी असा प्रस्ताव देण्याचे ठरविले. त्यानुसार व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीत तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भातील अडचणी आणि वेळेचा अपव्यय तसेच दुसर्‍या सत्राला होणारा उशीर लक्षात घेता परीक्षा ऑनलाईन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.

परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात

परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने, त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या (एमसीक्यू) असणार आहेत. या परीक्षांमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 'प्रॉक्टर्ड' पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. आता त्यात आणखी काही कडक नियम लागू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. संबंधित विद्यार्थी परीक्षा देताना जर बोलत असतील किंवा ते स्क्रीन सोडून बाहेर जात असतील, तर त्यांना परीक्षेतून बाद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परीक्षा अधिक पारदर्शी पद्धतीने व्हाव्यात, यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षांबाबतीत अधिक सतर्कता बाळगण्यात येणार असल्याने यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कसून तयारी करावीच लागणार आहे. प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आता परीक्षा विभागाला आहे. त्यामुळे विद्यार्थी कशाप्रकारे गैरप्रकार करू शकतात, याबाबत सर्व माहिती विभागाकडे आहे. नेमक्या त्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार असल्याने कॉपी करणार्‍यांना यंदा घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था

विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या अंध विद्यार्थ्यांनी जर ऑनलाइन परीक्षा देण्याची मागणी केली, तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्या वेळी विद्यापीठाच्या सहा अंध विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही परीक्षा देऊन पाहिली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता या वेळेलाही अंध विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एका सॉफ्टवेअरची निर्मिती केली असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑडिओद्वारे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी स्वत:च्या आवाजात उत्तरांचे पर्यात देतात आणि ते उत्तर रेकॉर्ड केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news