Fruit beer : पिणार्‍यांच्या आयुष्याची ‘माती’ अन् विकणार्‍यांची ‘चांदी’ | पुढारी

Fruit beer : पिणार्‍यांच्या आयुष्याची 'माती' अन् विकणार्‍यांची 'चांदी'

सोलापूर ; जगन्नाथ हुक्केरी : नशिल्या पदार्थांच्या दुनियेमध्ये अनेक विक्रमांवर मात करत फ्रूट बिअरने ( Fruit beer ) आपली जागा निर्माण केली. Fruit beer ची ३०० मिलीलिटरला फक्‍त आणि फक्‍त २५ रुपये किंमत असून विकणार्‍याला १० ते १५ रुपये नफा मिळतो. स्वस्तात नशा करण्याच्या नादात पिणार्‍याच्या आयुष्याची ‘माती’ होत असून विकणार्‍यांची मात्र ‘चांदी’ हाेत आहे.

बहुतांश जणांना नशेशिवाय करमत नाही. नशाच त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असतो. व्यसन कोणते का असेना, तलफ भागविणे हेच त्यांचे ध्येय असते. महागडे व्यसन भागविण्याची साधने परवडेनाशी झाले की ते कमी किंमतीच्या साधनांकडे वळतात. तेच त्यांच्यासाठी पंचप्राण होऊन जाते. त्यातूनच नव्यानव्या पर्यायांचा शोध लागतो. कदाचित त्याची निर्मितीही केली जाते. यासाठी अनेक फंडे तयार आहेतच.

अनेक माध्यमे निर्मितीची माहिती उपलब्ध करुन देतात. गरज ही शोधाची जननी आहे, हे वाक्य व्यसनालाही लागू पडते.
लॉकडाऊनच्या काळात तर जगच बंद होते. यामुळे घरातच अनेकानी नवनवे प्रयोग करण्यात आले. याच प्रयोगातून घरगुती बिअर, अल्कोहोल, अन्य व्यसनांचे पेय बनविण्यात आले. त्यातूनच आपली तलफ भागविण्यात आली. आजही अनेकजण त्याचाच वापर नशेसाठी करत आहेत.

फ्रूट बिअर ( Fruit beer ) बनविण्यासाठी लागणारी साधने ही एकदम खराब आणि कचराकुंडीत टाकण्याच्या स्थितीतीलच आहेत. त्यात सडायला लागलेली, कुजून दुर्गंधी सुटण्याच्या स्थितीत असलेल्या फळांचा वापर केला जातो. त्यात कलर, चव आणि फेससाठी आवश्यक त्या घटकांचा वापर केला की पेय बनून तयार होते. पाण्यात सगळ्या प्रकारची फळे भिजवण्यात येतात. त्यात लिंबू, मोसंबी, पायनापल, अद्रक, द्राक्षे, दालचिनी यासह इतर फळे, काळे मीठ, गरज भासल्यास कॉफी पावडरसह मसाले घालून २४ तास एका भांड्यात आंबविण्यासाठी ठेवतात.

आंबवण्यासाठी ईस्ट पावडरचा वापरही केला जातो. याच्या मिश्रणातून तयार झालेले द्रव्य बाटली बंद करुन चार ते पाच दिवस ठेवण्यात येते. त्यानंतर यात अल्कोहोल तयार होते. चांगल्या, ताज्या फळांचा वापर केल्यास यात ४ ते ५ टक्के अल्कोहोल तयार होते. सडकी फळे, रसायने, हायड्रोक्‍लोरिक, गांजाचे पाणी घातल्यास अल्कोहोलचे प्रमाण अधिक वाढते. सडलेली फळे आणि इतर मिश्रणांचा वापर करुन बिअर बनविण्याचे प्रकार सध्या जोरात सुरु आहे.

कामगार, नशेसाठी आसुसलेले नागरिक, महागडे व्यसन न परवडणारे या पेयाच्या आहारी जात आहेत. यात फ्रूट बिअरचे उत्पादक, विक्रेत्यांना फायदा होत आहे, तर पिणार्‍यांच्या आयुष्यात मातीच होत आहे. यात शुद्धता, स्वच्छतेसह आरोग्याची कोणतीच काळजी घेतली जात नाही. शिवाय यावर कारवाई करण्यासाठी जी यंत्रणा आहे, तीही काहीच काम करत नसल्याने सोलापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात हा धंदा जोरात सुरु आहे. विडी घरकुल, पूर्व भाग, झोपडपट्ट्या, हद्दवाढ भागातील संगमेश्‍वरनगर, मल्लिकार्जुननगर, समाधाननगरसह अन्य भागांत मोठ्या प्रमाणात फ्रूट बिअरची विक्री सुरु आहे. त्याला ग्राहकही याच भागात अधिक मिळत आहेत.

निर्मितीसाठी मशिनही उपलब्ध

आरोग्याची वाट लावणार्‍या फ्रूट बिअरची निर्मिती हाताने करता येते. याशिवाय बनविण्यासाठी खास मशिनही उपलब्ध आहे. या मशिनची किंमती फारच कमी म्हणजे पाच ते सहा हजार रुपये इतकी आहे. यात बिअर बनविण्यापासून ते बाटली पॅक करण्यापर्यंतच्या प्रक्रियेची सुविधा आहे. सोलापुरात दोन्ही प्रकारांतून फ्रूट बिअरची निर्मिती केली जात आहे. सोलापूरजवळच असलेल्या एका घरकुलासह एका तांड्यावर फ्रूट बिअर बनविण्याच्या भट्ट्या पेटत आहेत.

ड्रेनेजचे पाणी आढळूनही धंदा जोमातच

२५ ऑगस्ट २०२१ च्यादरम्यान सोलापुरातील पूर्व भागात खुलेआम विकल्या जाणार्‍या फ्रूट बिअरमध्ये चक्क ड्रेनेजच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावरून अन्न प्रशासनाने फ्रूट कंपनी आणि विक्रेत्यांवर जेलरोड आणि वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले होते. असा प्रकार घडून आणि गुन्हा दाखल होऊनही पुन्हा हा धंदा जोमात सुरु असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

प्रयोगशाळेच्या तपासणीत धोकादायक पदार्थांची भेसळ होत आहे. बिअरमधील पाणी मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवालही प्रयोगशाळेने दिला होता. आरोग्याची काळजी कोणत्याच ठिकाणी घेतली जात नाही. यामुळे अपघातासह अन्य आजारांना बळी पडून मरणाला कवटाळणार्‍यांची संख्या अधिकच आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button