सांगली :सांगलीत ट्रॅक्टरच्या धडकेने बालिका ठार | पुढारी

सांगली :सांगलीत ट्रॅक्टरच्या धडकेने बालिका ठार

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथे अन्वेषा निर्भय विसपुते (वय 12, रा. हरिपूर) या बालिकेला उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने चिरडले. तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. निर्भय दत्तात्रय विसपुते यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी याप्रकरणी ट्रॅक्टर चालक संभाजी बाबुराव भोसले (वय 44, रा. कसबे डिग्रज) याला अटक केली आहे.
घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अन्वेषा सकाळी खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती. सकाळी दहाच्या सुमारास सायकलने ती घरी परतत होती. फूटपाथच्या खडी-भरावामुळे तिला सायकल कडेला घेता आली नाही.

ट्रॉलीच्या मागील चाकाखाली ती चिरडली गेली. अपघातानंतर चालक भोसले पळून गेला. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिदंकर यांच्यासह पथक घटनास्थळी गेले. पंचनामा करून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. सायंकाळी चालक भोसले याला ताब्यात घेण्यात आले. विसपुते कुटुंबीय निळकंठनगरात राहतात.

अन्वेषा ही पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकत होती. अतिशय हुशार आणि मनमिळाऊ अशा अन्वेषाचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

या ठिकाणी गरज नसताना पेव्हिंग ब्लॉक बसवले आहेत. अनेक दिवसांपासून त्या कामाचे साहित्य रस्त्यावर पडून आहे. त्यामुळे अन्वेषाचा जीव गेला, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. मनाई आदेश तरी उसाची वाहने शहरात उसाने भरलेली वाहने शहरातून घेऊन जाण्यास मनाई आदेश आहे.

तरीही शहरातून उसाची वाहने जात आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होतो. मंगळवारी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या अपघातात बालिकेचा बळी गेला. वाहतूक शाखेच्या प्रमुख प्रज्ञा देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. मनाई आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button