सातारा : सावधान… शेळ्या, म्हशींवरही चोरट्यांचा डल्ला | पुढारी

सातारा : सावधान... शेळ्या, म्हशींवरही चोरट्यांचा डल्ला

खेड (अजय कदम) : सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात शेतात चरायला सोडलेल्या, गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर डोळा ठेऊन सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या शेळ्या चोरीला जाण्याचे प्रकार सुरू झाले असून तक्रार करूनही शेळ्या चोरीच्या गुन्ह्यांकडे पोलिसांकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य व गरीब शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसत आहे. शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिसकावून घेणार्‍या या ठगांच्या टोळीच्या मुळाशी जाऊन पर्दाफाश करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

शेतीतून मिळाणारे उत्पन्न पुरेसे नसल्याने अनेक शेतकरी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून शेळ्या व म्हशी, गाई पाळणे हा शेतीपूरक उद्योग करीत आहेत. शेतीतून निघणार्‍या चार्‍यावर या प्राण्यांची जोपासना करून शेतकरी आपले कुटुंब चालवत आहेत.

शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, निसर्गाच्या लहरीपणा यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी शेळ्या, म्हशी पाळून त्याच्या संसाराच्या गाड्याला कसाबसा सावरत हातभार लावत असतो. परंतु सर्वसामान्य शेतकर्‍याच्या या हक्काच्या दोन पैशावरही काही बाजारबुणगे डोळा ठेऊन आपले उखळ पांढरे करून घेतात. चोरट्यांचे नवनवे फंडे पहायला मिळत असल्याने पोलिसांनी आता त्यांच्यावर जरब बसवण्याची गरज आहे.

कमी रकमेच्या शेळ्यांसाठी किती त्रास घ्यायचा? पोलिसांची भावना

शेळ्या चोरीच्या गुन्ह्यांकडे पोलिसांकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. तर चोरीला गेलेल्या शेळ्यांची शासकीय किंमत कमी असते. त्यामुळे एवढ्या कमी रकमेच्या चोरीसाठी किती त्रास घ्यायचा असा पोलिसांचा द़ृष्टिकोन असतो. परंतु सामान्य शेतकर्‍यांसाठी त्याची मोठी किंमत असते.

शेळ्या दोन – चार तासांच्या आत दुसर्‍या जिल्ह्यात

गोठ्यात बांधलेल्या, शेतात चरायला सोडलेल्या शेळ्यांवर चोरट्यांचा डोळा असतो. चारचाकी गाड्यांसह चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. उचलेल्या शेळ्या, बोकड गाडीत टाकून तातडीने जिल्हयाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाते. जिल्ह्याच्या लगत असलेल्या काही तालुक्यांमध्ये या टोळ्यांची कनेक्शन आहेत. जिल्ह्यातून उचलेल्या शेळ्या दोन – चार तासांच्या आत दुसर्‍या जिल्ह्यात नेल्या जातात. शेतकर्‍यांना चोरीची माहिती होऊन तो पोलिस ठाण्यात तक्रार करायला जाईपर्यंत आणि पोलिसांची प्रत्यक्ष तपासाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत चोरलेल्या शेळ्या, बोकड दुसर्‍या जिल्ह्यात पोचलेल्या असतात. त्यातही प्रामुख्याने शेळ्या,बोकडांची खाटकाला विक्री केली जाते. त्यामुळे पोलिस माग काढायला जाईपर्यंत या शेळ्या, बोकडांची कटाई होऊन विक्री झालेली असते. त्यामुळे पोलिसांना कोणत्याही प्रकारचा पुरावा सापडत नाही. या व्यवसायातून अनेक जण धनदांडगे झाले आहेत. कायदा आपले काहीच करू शकत नाही . याची खात्री झाल्याने काहीनी दिवसाढवळ्या डल्ला मारण्याचाही उद्योग सुरू केला आहे.

ठोस कारवाईची आवश्यकता….

शेळ्या, म्हशी चोरीच्या तक्रारी करून पोलिसांकडून अनेक वेळा तपास होत नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट असून चोर्‍या रोखण्यासाठी व टोळ्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिस दलाकडून ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. त्याद़ृष्टीने कारवाईचा धडाका सुरू करण्याची मागणी होत आहे.

सातारा तालुक्यातील ‘या’ गावांच्या परिसरात चोरटे निर्ढावलेत

सातारा तालुक्यातील आरळे, वडूथ, शिवथर, पाटखळ मालगाव, महागाव, खेड, संगममाहुली, धनगरवाडी यासह अन्य गावातील शेतकर्‍यांच्या म्हैस विशेषतः शेळ्या चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या गावांच्या परिसरात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत.

Back to top button