सोलापूर : मोहोळ नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर; २० पैकी १० जागा महिलांसाठी राखीव | पुढारी

सोलापूर : मोहोळ नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर; २० पैकी १० जागा महिलांसाठी राखीव

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत १३ जून रोजी जाहीर करण्यात आली. एकूण १० प्रभागांतील २० पैकी १० जागांवार महिलांचे अधिकृत आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये २ जागा अनुसूचित जाती महिला तर ८ जागा सर्वसाधारण माहिलेसाठी आरक्षीत झाल्या आहेत. उर्वरित दहा जागांपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण म्हणून आरक्षित झाली असून नऊ जागा सर्वसाधारण आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याच्या तयारीला सुरुवात केल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे.

मोहोळ नगरपरिषद कार्यालय १३ जून रोजी दुपारी एक वाजता निवडणूक नियंत्रण अधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निहाय आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. यामध्ये दहा प्रभागांपैकी लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असणाऱ्या प्रभाग क्रमांक २, ४ व ५ मध्ये चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले.

प्रभाग क्रमांक २ मधील ‘अ’ व प्रभाग ४ मधील ‘अ’ या दोन जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्या तर प्रभाग क्रमांक ५ मधील ‘ब’ ही एक जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण म्हणून आरक्षित करण्यात आली. उर्वरित प्रभागातील १७ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी ‘अ’ या ८ जागांवर सर्वसाधारण महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पन्नास टक्के महिला राजकीय आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळे मोहोळ नगरपरिषदेच्या २० पैकी १० जागांवर महिलांचे आरक्षण घोषित झाले असली तरी उर्वरित दहा जागांवर देखील महिलांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत मोहोळ शहरात ‘महिलाराज’ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणूक नियंत्रण अधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, प्रशासन अधिकारी सुवर्णा हाके, आरोग्य अधिकारी महेश माने, कर निरिक्षिका प्रियांका चव्हाण, कार्यालयीन सहाय्यक दिनेश गायकवाड, किशोर स्वामी, दिलीप जाधव, राजू शेख, कोंडीबा देशमुख आदींनी ही आरक्षण सोडत प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. यावेळी मोहोळ शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कही खुशी कही गम

सर्वपक्षीय इच्छुकांना आपल्या प्रभागात कोणते आरक्षण पडेल याची चिंता लागली होती. आरक्षण जाहीर झाल्यानंतर मात्र त्यातील काही इच्छुकांच्या मनासारखे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तर काही इच्छुकांचा अपेक्षा भंग झाल्याने पुढे आता काय करायचे म्हणून पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे.

प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे:

  • प्रभाग क्र. १-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. २-
    अ) अनुसूचित जाती महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. ३-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. ४-
    अ) अनुसूचित जाती महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. ५-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) अनुसूचित जाती सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. ६-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. ७-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. ८-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. ९-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) सर्वसाधारण.
  • प्रभाग क्र. १०-
    अ) सर्वसाधारण महिला.
    ब) सर्वसाधारण.

Back to top button