Ukraine Russia War : रशियन अण्वस्त्रे ‘हाय अ‍ॅलर्ट’वर, पुतीन यांचे लष्कराला आदेश | पुढारी

Ukraine Russia War : रशियन अण्वस्त्रे ‘हाय अ‍ॅलर्ट’वर, पुतीन यांचे लष्कराला आदेश

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाकडून युक्रेनवर हल्ले (Ukraine Russia War) सुरू असतानाच, अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी, ‘न्यूक्लिअर डिटरंट फोर्स’नी हाय अलर्टवर राहावे, असे आदेश रविवारी जारी केले. आपली अण्वस्त्रे कुठल्याही क्षणासाठी सज्ज ठेवावीत, असे पुतीन यांनी या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनने चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर रशियाच्या शिष्टमंडळाबरोबर बेलारूसच्या सीमेवर उभय देशांदरम्यान चर्चा सुरू झाल्याचे रात्री उशिराचे वृत्त आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात चौथ्या दिवशीही युद्ध सुरू आहे. रशियाकडून होणार्‍या हल्ल्यांना युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. कीव्ह आणि खार्किव्हमध्ये रशिया आणि युक्रेनचे सैन्यात चकमकी सुरू आहेत. रशियाने रविवारी पेट्रोलियम बेससह युक्रेनमधील गॅस पाईपलाईनही उद्ध्वस्त केली. लगोलग रशियाकडून कीव्ह शहरावर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, असा ‘अलर्ट’ युक्रेनकडून जारी करण्यात आला.

युक्रेनच्या खार्किव्हसह अनेक शहरांमध्ये रशियन लष्कर दाखल झाले. रशियाकडून युक्रेनच्या लष्करी तळांवरच नव्हे तर नागरी वस्त्यांवरही हल्ले तीव्र झाले, तशी युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की हे रशियाने निवडलेल्या बेलारूस या देशातच रशियाशी चर्चा करायला विनाशर्त तयार झाले.

दुसरीकडे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी, युक्रेनने केवळ चर्चेची तयारी दर्शविली म्हणून हल्ले थांबणार नसल्याचा उद्दाम दम दिला आहे.

घातपाताच्या भीतीमुळे आधी युक्रेनचा नकार (Ukraine Russia War)

रशियाने युक्रेनला बेलारूस या नजीकच्या देशात चर्चेसाठी यावे म्हणून धाडलेल्या सांगाव्याला युक्रेनने नकार दिला होता. बेलारूस हा रशियाचा मित्र देश असल्याचे कारण त्यामागे होते. आम्ही रशियासोबत चर्चेला तयार आहोत. पुतीन यांना आम्ही भेटू इच्छितो. कारण आम्हाला शांतता हवी आहे. व्हर्साय, ब्रास्तिलावा, बुडापेस्ट, बाकू किंवा मग तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे बैठक आयोजिल्यास चर्चेसाठी आम्ही केव्हाही तयार आहोत, असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले होते. इस्रायलचे नेते बेनेट यांनी पुतीन यांना फोन केल्यानंतर लगोलग चर्चेसाठी रशियाने ठरविलेल्या बेलारूस देशावर झेलेन्स्की यांनी सहमती दर्शविली.

झेलेन्स्कींची इस्रायलला गळ (Ukraine Russia War)

तत्पूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांनी व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बेनेट हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्कींशी याआधीच बोललेले आहेत. झेलेन्स्की यांनी बेनेट यांना मध्यस्थी करावी म्हणून गळ घातलेलीच होती. अर्थात, इस्रायलकडून यासंदर्भात कुठलेही अधिकृत वक्‍तव्य अद्याप आलेले नाही.

हल्ल्यांची तीव्रता कमी होणार

बैठक होणार म्हणून हल्ले थांबविणार नाही, असा इशारा पुतीन यांनी दिलेला असला तरी हल्ल्यांची तीव्रता आता कमी होईल, असे मानले जात आहे.

प्रीप्यत नदीकाठावर चर्चा

युक्रेन-बेलारूस सीमेवर प्रीप्यत नदीच्या काठावर रशिया-युक्रेनदरम्यान ही बैठक होईल, असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

अ‍ॅलेक्झांडर यांनी घेतली दगाबाजी न होण्याची हमी

बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेक्झांडर ल्युकाशेंको यांनी बैठकीदरम्यान कुठल्याही प्रकारची दगाबाजी होणार नाही, याची हमी घेतली आहे.

खार्किव्हमध्ये रशियन घुसखोरी

चौथ्या दिवशीही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच आहेत. खार्किव्ह या युक्रेनच्या दुसर्‍या क्रमांकाच्या शहरातही रशियन सैनिकांनी रविवारी घुसखोरी केली. उत्तरेकडील दोन मोठ्या शहरांवर संपूर्ण ताबा मिळविल्याचा दावाही रशियाने केला.

वस्त्यांवर क्षेपणास्त्र हल्ले

कीव्ह, खार्किव्ह, काखोवका, खेरसॉन, बर्डियान्स्क, मेलिटोपोलसारख्या शहरांतून रविवारी रहिवासी वस्त्यांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे अनेक उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळल्या. आबालवृद्धांचा आक्रोश व पळापळ असे द‍ृश्य सर्वत्र आहे. लोकांची अन्‍नान्‍नदशा आहे. लोक मिळेल त्या साधनाने पोलंड, रोमानिया, हंगेरीच्या सीमा ओलांडत आहेत. युद्धामुळे युक्रेनमधील 3 लाख 76 हजार लोकांनी अन्य देशांत स्थलांतर केले आहे, असे संयुक्‍त राष्ट्रांनी सांगितले. काहींच्या मते हा आकडा 10 लाखांवर आहे.

रशियाने रविवारी सकाळी ओखत्यर्का भागात केलेल्या हल्ल्यात एका 7 वर्षांच्या मुलीसह 6 नागरिकांचा मृत्यू झाला. खार्किव्हमधील गॅस पाईपलाईनही रशियन लष्कराने उडवून दिली. कीव्हलगतच्या बार्सिलकीव्ह येथील पेट्रोलियम बेसवर गोळे डागले. पेट्रोलियम बेसमध्ये त्यामुळे आग लागलेली असून, युक्रेनचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

रशियन हल्लासत्रामुळे आजअखेर दीड लाखांहून अधिक युक्रेनियन निर्वासित पोलंड, मोल्दोवा आणि रोमानियात दाखल झालेले आहेत, असे संयुक्‍त राष्ट्रांतील एका अधिकार्‍याने सांगितले.

चहूबाजूंनी रशियन फौजांनी युक्रेनची नाकेबंदी केली आहे. राजधानी कीव्हसह खार्किव्ह, मेलिटोपोलसारख्या शहरांतून रशियन सैनिक लुटालूट करत आहेत. खार्किव्हमध्ये रशियन सैनिकांनी एका बँकेची लूट केली. एका दुकानात शिरून रशियन सैनिक साहित्य लांबवत असल्याचे द‍ृश्यही समोर आले आहे.

युक्रेनच्या बचावासाठी युक्रेनियन लष्करासह नागरिकांनीही रशियन लष्कराविरुद्ध शस्त्रे उचलली आहेत. महिलाही रशियन सैनिकांशी दोन हात करत आहेत. आजअखेर 4 हजार 300 रशियन सैनिकांचा खात्मा आम्ही केला आहे, असा दावा युक्रेनने केला. रशियाचे 146 रणगाडे, 27 विमाने आणि 26 हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त केल्याचेही युक्रेनकडून सांगण्यात आले. रशियन लष्कराच्या बाजूने लढत असलेल्या चेचेन स्पेशल फोर्सच्या टॉप जनरलचा युक्रेनियन सैनिकांनी खात्मा केला.

ब्रिटनकडून ‘त्यांना’ खास सवलत

ब्रिटनमधील जे कुणी लोक युक्रेनला जाऊन रशियाविरुद्ध लढू इच्छित असतील, त्यांना ब्रिटिश सरकारकडून सर्वप्रकारे मदत केली जाईल, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिझ ट्रूस यांनी जाहीर केले. रशियाने घुसखोरी बंद न केल्यास रशियन नेत्यांवर आणि लष्करी अधिकार्‍यांवर ‘वॉर क्राईम’अंतर्गत दावे दाखल केले जातील, असा इशाराही ट्रूस यांनी दिला.

जपानी अब्जाधीशाची मदत

जपानचे अब्जाधीश हिरोशी मिकी मिकितानी यांनी युक्रेनला 87 लाख डॉलर दान करण्याची घोषणा केली. मिकी नावाने प्रसिद्ध असलेले हिरोशी म्हणाले, रशियाचा हा हल्ला जगाने वेगळ्या चष्म्यातून पाहायला हवा. लोकशाही असलेल्या प्रत्येक देशाने त्याचा मिळून मुकाबला केला पाहिजे. मिकी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांना पत्रही लिहिले आहे.

जर्मनीकडून युक्रेनला शस्त्रे

जर्मनीने युक्रेनला 1,000 रणगाडाभेदी शस्त्रे, 500 ‘स्टिंगर’ क्षेपणास्त्रे पाठविण्याचे जाहीर केले. जर्मन हवाई हद्दीत रशियन विमानांना बंदी घातली.

उत्तर कोरियाची अमेरिकेला तंबी

रशिया आणि युक्रेन वादाला अमेरिका कारणीभूत आहे. अमेरिका अन्य देशांच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप करते आणि त्याला शांततेचा प्रयत्न म्हणते. अमेरिका आता एकमेव महासत्ता नाही. कधी काळी ते खरे होते, पण ते दिवस आता खूप मागे पडले आहेत, हे अमेरिकेने लक्षात घ्यावे, अशी तंबी उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनातून देण्यात आली आहे.

अ‍ॅलन मस्कही युक्रेनच्या मदतीला

युद्धामुळे युक्रेनमध्ये उद्भवलेली इंटरनेट कनेक्टिव्हिटी समस्या दूर करण्यासाठी टेस्लाचे अध्यक्ष अ‍ॅलन मस्क पुढे सरसावले आहेत. स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँडच्या माध्यमातून ते युक्रेनला इंटरनेट सेवा देणार आहेत. युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी समाजमाध्यमांतून मदतीचे आवाहन करताच मस्क यांनी युक्रेनमध्ये स्टारलिंक सॅटेलाईट तैनात करण्याचे जाहीर केले.

इस्रायलच्या पुढाकाराचे कारण

झेलेन्स्की हे ‘ज्यू’धर्मीय (यहुदी) आहेत. इस्रायल हे जगातील एकमेव ज्यूधर्मीय राष्ट्र आहे, हेही येथे महत्त्वाचे! पुतीन यांनी झेलेन्स्की यांच्यावर टीका करताना ‘नवनाझीवादी’ हा शब्द वापरला होता, त्याला हरकत घेताना मी स्वत: ज्यूधर्मीय आहे, मी नाझीवादी कसा असू शकतो, असे उत्तर झेलेन्स्की यांनी दिले होते. झेलेन्स्की यांच्याबद्दल संपूर्ण इस्रायलमध्ये सहवेदनेची भावना आहे. यातूनच इस्रायलने हा पुढाकार घेतला.

ताज्या घडामोडी रशिया-युक्रेन

* युक्रेन-रशिया चर्चेसाठी ‘इस्रायल’ची मध्यस्थी
* बेलारूसमध्ये प्रीप्यत नदी काठावर चर्चा सुरू
* चर्चा होणार म्हणून हल्ले थांबवणार नाही : पुतीन
* युक्रेनची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव; रशियाची लष्करी कारवाई थांबवा : झेलेन्स्की
* युक्रेनच्या खार्किव्ह, काखोवका शहरात रशियन लष्कराची घुसखोरी
* युक्रेन बेहाल, हल्‍ले परतविण्यासाठी
* निकराची लढाई
* युक्रेनची पेट्रोलियम बेस,
* गॅस पाईपलाईनही उद्ध्वस्त!
* युक्रेनच्या अनेक शहरांतून वस्त्यांवर क्षेपणास्त्र हल्ले
* बार्सिलकिव्ह ‘पेट्रोलियम बेस’ला गोळाबारीने आग
* अण्वस्त्र हल्ल्याच्या भीतीने युक्रेनचे दक्षतेचे आदेश
* युक्रेनमधून 4 लाख लोकांचे स्थलांतर : संयुक्‍त राष्ट्रे

Back to top button