

सार्वजनिक आरोग्य विभागाची गट ड पदांसाठी परिक्षा उद्या (दि. 31) रोजी घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने काही व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये पसरविण्यात येत आहेत. व्हिडिओमध्ये परिक्षेचे हजेरी पत्रक (ATTENDENCE SHEET) आहे. त्यावरून विभागाचा गट ड संवर्गातील परिक्षेच्या पेपरफुटी ची अफवा पसरविण्यात येत आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे सर्व उमेदवारांनी परिक्षेसंदर्भातील कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
समाजमाध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो आरोग्य विभाग पेपरफुटी झाली असे त्याचे वर्णन करण्यात येत आहे. यामध्ये काही उमेदवाराचे नावे दिसत असून आरोग्य भरतीचा पेपर फुटला असे पसरविण्यात येत आहे. त्यामुळे, उद्या होणाऱ्या परिक्षेबाबत उमेदवार संभ्रमात पडले आहेत.
आरोग्य विभाग पदभरती परिक्षेबाबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत खुलासा करण्याची मागणी युवासेनेचे कल्पेश यादव यांनी देखील केली होती. आरोग्य विभागाच्या प्रत्येक पद भरती परीक्षेत काही संघटनेकडून आरोग्य विभाग व यंत्रणेस बदनाम करण्याचे कारस्थान रचले जाते सदर व्हिडिओ आणि मेसेज राज्यभरात व्हायरल होतो आहे. याचा थेट परिणाम परीक्षार्थी तरुणांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे या व्हिडीओ बाबत तातडीने चौकशी करून व्हिडिओ फेक असल्यास संबंधित संघटनेवर तातडीने कारवाई करावी अथवा व्हडिओ सोबग जोडलेल्या संदेशात तथ्य असल्यास व्हिडीओ मधील संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या कडे यादव यांनी केली आहे.
याबाबत राज्याच्या आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या की व्हिडिओमध्ये दिसणारे हजेरी पत्रक (ATTENDENCE SHEET) हे गोपनिय दस्तावेज नसुन ते नियमित स्टेशनरी सोबत पाठविण्यात येते. काही वेळा स्थानिक पातळीवर छापून घेण्यात येते. त्यामुळे हा पेपरफुटीचा प्रकार नसुन परिक्षेसंदर्भात लागणा-या नियमित कागदपत्रांचा भाग आहे, त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
हे ही वाचलं का?