Thane Lok Sabha Election : ठाण्यात हायव्होल्टेज लढती | पुढारी

Thane Lok Sabha Election : ठाण्यात हायव्होल्टेज लढती

शशिकांत सावंत (ठाणे)

ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघांत चुरशीच्या लढती होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदार संघात तर हायव्होल्टेज निवडणूक होणार आहे. विरोधकांनाही येथे ताकदवार उमेदवार देण्याचा निर्णय महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. यामध्ये वरुण सरदेसाई किंवा महिला फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची चर्चा आहे. सुरुवातीला सुभाष भोईर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनी स्वतः नकार दिल्याने त्यांचे नाव आता मागे पडले आहे. कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव पुढे येऊ शकते. ( Thane Lok Sabha Election )

संबंधित बातम्या 

ठाणे जिल्ह्यातील लक्षवेधी असलेली कल्याण मतदार संघातील निवडणूक महाराष्ट्रभर चर्चेत आहे. श्रीकांत शिंदे आपल्या मतदार संघात सध्या तळ ठोकून आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण 60 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघात ठाणे शहर, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई अशा तीन महापालिकांचे क्षेत्र येते. या मतदार संघात ठाणे शहरचे भाजपचे आमदार संजय केळकर राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक या तिघांची नावे महायुतीकडून चर्चेत आली. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. ठाणे लोकसभेसाठी डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र फाटक हे इच्छुक असून, ही जागा भाजपकडे जाणार असल्याने फाटक यांची डाळ शिजणे कठीण आहे. ठाणे लोकसभा कुणाची, यावरून महायुतीत सध्या रस्सीखेच असली, तरी या लोकसभा मतदार संघात भाजपचे चार आमदार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत.

त्यामुळे आमदारांच्या निकषातही हा मतदार संघ भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप या मतदार संघात आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी उमेदवार ठरला नसतानाही प्रयत्न करत असल्याचे दिसते. कल्याणमध्ये भाजपची मदत श्रीकांत शिंदेंना लागणार आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपचे दोन आमदार आहेत. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि गोळीबाराने प्रसिद्ध झालेले गणपत गायकवाड यांचा समावेश आहे. मात्र, गणपत गायकवाड आणि शिंदेंच्या शिवसेनेत असलेले विळा-भोपळ्याचे नाते लक्षात घेता, गायकवाडांच्या कार्यकर्त्यांची मदत श्रीकांत शिंदे यांना किती मिळणार, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाणांवर भाजपच्या बाजूची मदार असणार आहे.

या मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हेही येतात. महायुतीत मनसे सहभागी झाल्यास त्यांचाही पाठिंबा श्रीकांत शिंदे यांना मिळू शकतो. त्यामुळे श्रीकांत शिंदेंची जागा ही महायुतीची अवघड नाही, तरीही महाविकास आघाडीकडून येथे कडवे आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यात येणारा तिसरा मतदारसंघ भिवंडी हा आहे. या मतदार संघात भाजपने केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांना उमदेवारी जाहीर केली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे अजून ठरलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही या मतदार संघावर दावा सांगितल्याने मतदार संघ मिळवण्याच्या स्पर्धेने वेग घेतला आहे. काँग्रेसकडून निलेश सांबरे, तर राष्ट्रवादीकडून सुरेश म्हात्रे इच्छुक आहेत. त्यामुळे मतदार संघ कुणाकडे जातो, यावर महाविकास आघाडीचा उमदेवार कोण? हे ठरणार आहे.

सांबरे गेले वर्षभर या मतदार संघात काम करत आहेत. तर सुरेश म्हात्रे उमेदवारी मिळेल याच हेतूनी शिंदे गटातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यांनीही आपला प्रचार सुरू केला आहे. या मतदार संघात भाजपचे दोन, शिवसेना शिंदे गट दोन, तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि समाजवादी पार्टी एक अशा आमदारांचे संख्याबळ आहे. कपिल पाटील यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर किसन कथोरे यांची भेट घेत पक्षांतर्गत कुरबुरी मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा या मतदार संघात सर्वाधिक फिरली. त्यामुळे काँग्रेसलाही न्याय यात्रेच्या गरुडावर आरूढ होऊन निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे इथल्या निवडणुकीला काँग्रेस विरुद्ध भाजप असाच रंग पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्याच्या या तिन्ही लढती हायव्होल्टेज उमेदवारांमुळे अधिक लक्षवेधी होऊ लागल्या आहेत. ( Thane Lok Sabha Election )

Back to top button