Lok Sabha Election 2024 : मुस्लिम धार्जिन की हिंदूविरोधाचा ठपका? जाणून घ्या देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण | पुढारी

Lok Sabha Election 2024 : मुस्लिम धार्जिन की हिंदूविरोधाचा ठपका? जाणून घ्या देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राजकारणात २१ व्या शतकात दूरगामी असे बदल झालेले आहेत. काँग्रेसचे अधःपतन, भाजपचा उदय, प्रादेशिक पक्षांचा भक्कमपणा, राजकीय व्यवस्थेत दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून सत्तेत वाटा मिळवण्यासाठीचे प्रयत्न आणि मुस्लिम समाजाचे राजकीय परिघाबाहेर फेकले जाणे हे पाच बदल महत्त्वाचे मानले जातात. यातील मुस्लिम समाजाच्या अनुषंगाने होत असलेले राजकीय बदल समजून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करत आहोत. (Lok Sabha Election 2024)

मुस्लिम धार्जिन की हिंदूविरोधी?

भारतीच्या राजकारणात एखाद्या पक्षावर मुस्लिम धार्जिन असल्याचा शिक्का पडणे ही काही नवी बाब नाही. पण हिंदू मतदार बऱ्याच वेळा मुस्लिम धार्जिन पक्षांना मतदान करतात, असे The Pro-Incumbency Century या ग्रंथात यशवंत देशमुख आणि सुतानू गुरू यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी तृणमूल काँग्रेस, आम आमदी पार्टी अशा काही पक्षांची उदाहरणे दिली आहेत. पण जर एकाद्या पक्षावर हिंदूविरोधी शिक्का बसला किंवा तशी प्रतिमा निर्माण झाली तर मात्र हिंदू त्या पक्षाला मतदान करत नाहीत, असेही देशमुख आणि गुरू यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष सध्या ‘हिंदू विरोधी’ या सापळ्यात अडकल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या सापळ्यातून बाहेर पडणे काँग्रेसला अजून शक्य होत नाही, याचे कारण म्हणजे काँग्रेसची शीर्षव्यवस्था आणि ‘इको सिस्टम’ पक्षाला धर्मनिरपेक्ष चौकटीत बसवू पाहाते. पण प्रत्यक्षात धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हिंदूविरोधी असा लावला जात आहे. या सापळ्यात अडकू नये म्हणून राज्यपातळीवर भाजपविरोधी पक्ष आणि अगदी काँग्रेसचे राज्यातील नेतेही करत असतात, पण शीर्षस्थानी व्यवस्था मात्र यातून बाहेर पडू शकलेली नाही.

मुस्लिमबहुल मतदारसंघांचे राजकारण

तर दुसरीकडे मुस्लिम मतदारांची संख्या ही देशभरात विखरुलेली असल्याने त्यांना पुरसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे देशातील चित्र आहे. १९५२ ते २०१४ या कालावधित देशात १६ लोकसभा निवडणुका झाल्या. २०१४ची लोकसभा ही १६ वी लोकसभा होय. या सर्व १६ लोकसभांचा विचार केला तर ४८९ मुस्लिम खासदार निवडून आले आहेत. ज्या राज्यांत मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे, तेथून जास्त संख्येने मुस्लिम खासदार निवडून आलेले आहेत.

भारतातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी ५० टक्के मुस्लिम लोकसंख्या ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या तीन राज्यांत आहे. संसदेतील प्रतिनिधित्वाचा जर विचार केला, तर १६ लोकसभांत निवडून आलेल्या मुस्लिम खासदारांपैकी ५२ टक्के खासदार हे या तीन राज्यांतील आहेत. या तीन राज्यांनंतर केरळ आणि पूर्वीच्या जम्मू काश्मीर राज्याचा नंबर येतो.

भारतात २९ लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे एकूण मतदारांत मुस्लिम मतदारांची संख्या ४० टक्केच्या वर आहे. प्रणोय रॉय आणि दोराब सुपारीवाला यांनी लिहिलेल्या The Verdict या ग्रंथात ही आकडेवारी देण्यात आलेली आहे. रॉय आणि सुपारीवाला यांनी १९९८नंतरच्या पाच लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केला. या कालावधित लोकसभेवर निवडून जाणाऱ्या एकूण मुस्लिम खासदारांपैकी ५५ टक्के खासदार या २९ मतदारसंघातून निवडून येत असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. तर भारतातील ८२ टक्के लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतांची टक्केवारी २० टक्केपेक्षा खाली आहे.

मुस्लिम मतदार आणि राजकीय पक्ष | Lok Sabha Election 2024

भारतातील राजकीय पक्षांचा मुस्लिम मतदारांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. मुस्लिम मतदारांकडे सर्वाधिक दुलर्क्ष भाजप करते, असे रॉय आणि सुपारीवाला यांनी म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येत मुस्लिम समाजाचा वाटा १४ टक्के आहे, पण भाजपच्या एकूण उमेदवारांत मुस्लिमांचे प्रमाण १ टक्के इतके राहिले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षानेही मुस्लिमांकडे दुलर्क्ष केल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. काँग्रेसच्या एकूण उमेदवारांत मुस्लिमांची टक्केवारी फक्त ७ टक्के इतकी आहे. पण मुस्लिम उमेदवार निवडून येण्याचा काँग्रेसचा स्टाईक रेट हा सर्वांत जास्त म्हणजे ४६ टक्के आहे. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे मुस्लिमांना उमेदवारी देण्याचे प्रमाण १० टक्के आहे, तर या पक्षाचा मुस्लिम उमेदवार निवडून येण्याचा स्ट्राईक रेट ४० टक्के आहे. मुस्लिमांना उमेदवारी देण्यात लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (१७ टक्के), समाजवादी पार्टी (१६ टक्के), आणि तृणमूल काँग्रेस (१५ टक्के) या पक्षांचा क्रमांक वरचा आहे.

हेही वाचा

Back to top button