

वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. मात्र डाएट करताना वारंवार लागणारी भूक ही सर्वसामान्य अडचण आहे. अनेकदा अशी भूक तुमच्या संकल्पावर परिणाम करते आणि अन्नावरील नियंत्रण ढासळू शकते. पण काळजी करू नका! काही सोप्या आणि परिणामकारक उपायांमुळे तुम्ही तुमच्या भुकेवर नियंत्रण मिळवू शकता आणि तुमची वेट लॉस जर्नी यशस्वी करू शकता.
अनेक वेळा आपल्याला वाटते की भूक लागली आहे, पण खरंतर शरीराला पाण्याची गरज असते. अशावेळी पाणी पिल्याने भूक आटोक्यात राहते आणि पचनक्रियाही सुरळीत होते. लक्षात ठेवा शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे साधं पाणीच. इतर फ्लुइड्स जसं की ताक, लिंबूपाणी, ग्रीन टी यांचा अतिरेक टाळावा.
व्यायाम फक्त कॅलरी बर्न करतो असं नाही, तर तो भुकेवरही प्रभाव टाकतो. संशोधनानुसार, नियमित वर्कआउटमुळे भूक नियंत्रित होते. शरीरात ‘घ्रेलिन’ नावाचा हार्मोन कमी होतो जो भूक वाढवतो. त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर आणि आहारावर लक्ष केंद्रित करू शकता.
साखरमुक्त च्युइंग गम चघळल्याने मेंदूला अन्न मिळत असल्याचा संकेत मिळतो, परिणामी खाण्याची इच्छा कमी होते. यामुळे प्रोसेस्ड फूड किंवा स्नॅक्सकडे लक्ष जात नाही आणि तुम्ही ट्रॅकवर राहता.
डाएटमध्ये प्रोटीन असणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी तयार प्रोटीन बार खाण्यापेक्षा दही, पनीर, दूध, चिकन, मासे, मूग, चणे, डाळी यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करावा. हे पदार्थ पचनास सोपे असून दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.
डाएट करताना थोडं थोडं खाणं चुकीचं नाही, पण ते आरोग्यदायी असायला हवं. फळं, सुकामेवा, उकडलेली कडधान्यं हे उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळते आणि तुमचं वजनही नियंत्रणात राहतं.
डाएटमधून आवडते चवदार अन्न पूर्णपणे वगळल्यास मानसिक अस्वस्थता येते आणि त्यामुळे भूक वाढते. घरगुती मसाल्याचा समावेश असलेल्या पदार्थांचा मर्यादित वापर केल्यास समाधान मिळते आणि आहार दीर्घकाळ टिकतो.
रिफाइंड साखरेचा अतिरेक शरीरात इन्सुलिनची पातळी चढउतार करू शकतो, ज्यामुळे भूक अनियंत्रित होते. यासाठी साखरेच्या जागी गूळ, खजूर किंवा फळांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
जलदगतीने न खाता हळूहळू आणि शांतपणे जेवा. जेवताना मोबाईल, टीव्ही यापासून दूर राहा. अशा पद्धतीने खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लवकर शमते.
डाएटमधून नाश्ता वगळणं धोकादायक ठरू शकतं. नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे. यामुळे चयापचय सुरळीत राहतो आणि दिवसभर अति भूक लागण्याची शक्यता कमी होते.
कधी कधी भूक लागल्याचा भास हा मानसिक असतो. त्यामुळे आधी पाणी प्या, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि काही वेळ थांबा. खरंच भूक लागली असल्यासच खा.