

पावसाळा म्हणजे फक्त गारवा, गारवारा व गोड पाऊस नव्हे, तर अनेक आरोग्यविषयक समस्यांनाही निमंत्रण देणारा काळ आहे. या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रता वाढते आणि जलसाठ्यांमध्ये घाण साचल्याने सूक्ष्मजंतू व डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. मात्र, योग्य काळजी घेतल्यास या आजारांपासून सहज बचाव करता येतो.
टायफॉइड हा सॅल्मोनेला बॅक्टेरियामुळे होणारा आजार असून, तो दूषित पाणी व अन्नातून पसरतो. पावसाळ्यात अशुद्ध पाणी आणि अस्वच्छ अन्न टायफॉइडचा धोका वाढवतात. लक्षणांमध्ये सततचा ताप, डोकेदुखी आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो. त्यामुळे नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या आणि बाहेरील फळे किंवा स्ट्रीट फूड टाळा.
मलेरिया मादी अॅनोफिलीस डासाच्या चाव्यामुळे होतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. याचे लक्षण म्हणजे ताप, अंगात थंडी भरून येणे व घाम येणे. बचावासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका, मच्छरदानीचा वापर करा आणि संपूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा.
डेंग्यूचा प्रसार अॅडीज डासामुळे होतो. हा डास मुख्यत्वे दिवसा चावतो. डेंग्यूची लक्षणे म्हणजे तीव्र ताप, सांधेदुखी आणि त्वचेवर लालसर चट्टे. याचा धोका कमी करण्यासाठी कुंड्या, कुलर, टायर यामध्ये पाणी साचू देऊ नका. तसेच डासांपासून संरक्षणासाठी मॉस्किटो रिपेलंट वापरा.
पावसाळ्यात अन्न पटकन खराब होते. त्यामुळे अपचन, उलटी, जुलाब आणि पोटदुखी यासारख्या तक्रारी वाढतात. यासाठी घरचे ताजे अन्न खा, भाज्या स्वच्छ धुऊन शिजवूनच वापरा आणि बाहेरील अन्नपदार्थ टाळा.