

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदेशीरदृष्ट्या सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी शहराचे नाव संभाजीनगर होईल, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी (दि.१७) पत्रकार परिषदेत केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या सभेत खैरे यांचा उल्लेख करत संभाजीनगरच्या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर खैरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचीही उपस्थिती होती. खैरे म्हणाले, मी वीस वर्षांपासून नामकरणासाठी प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी त्यांना किमान शंभरवेळा भेटलो, त्यातील पन्नासवेळा मी त्यांच्यापुढे संभाजीनगरचा मुद्दा मांडला. तेव्हा तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार होते. परंतु त्यांनी केले नाही.
त्यांचेच एक नेते बहिरे
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आहेच, ते करण्याची काय गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्याचा समाचार घेत फडणवीस यांनी शिवसेनेने संभाजीनगरची मागणी सोडली असल्याचे सांगत अहो खैरे, आता तुम्ही व्हा बहिरे असे सुनावले. त्यावर फडणवीस हे मोठ नेते आहेत. पण त्यांना सांगू इच्छितो, मी बहिरा नाही. इथे त्यांच्याच पक्षाचे एक नेते बहिरे आहेत, पण मी त्यांचे नाव घेणार नाही, असे खैरे म्हणाले.
खासदाराचे धंदे बाहेर काढणार
शहरातील पाणीप्रश्नावरुन खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना भाजपवर टीका केली होती. इतके दिवस तुम्ही मनपात एकत्र सत्तेवर होतात. आता आंदोलन करत आहात, लोक तुम्हाला हंडे फेकून मारतील, असे जलील म्हणाले होते. त्यावर खैरे यांनी जलील यांचे एकेक धंदे हळूहळू बाहेर काढून जनतेसमोर मांडणार असे सांगितले.
कराड यांना मीच नगरसेवक केले
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी शहराच्या पाणीप्रश्नावरुन खैरे यांच्यावर टीका केली होती. त्याचाही समाचार खैरे यांनी घेतला. कराड यांना केंद्रात काय किंमत आहे, हे मी ओळखून आहे. मी २० वर्ष खासदार होतो, मुका खासदार नव्हतो. मी प्रश्न मांडत गेलो. शहरासाठी ७९२ कोटींची समांतर योजना मी मंजूर करुन आणली होती. पण ती योजना याच लोकांनी बंद पाडली. कराड यांना आधी नगरसेवक, नंतर महापौर मीच बनविले, त्यांनी हे विसरु नये, असेही खैरे म्हणाले.