

उदगीर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तोंडार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 15 विद्यार्थ्यांना मध्यान भोजनातून (खिचडी) विषबाधा झाली. त्यांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्यान भोजनानंतर शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांना अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे तसेच त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे तातडीने त्यांना प्रभारी मुख्याध्यापक रणजीत फड यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. अनिकेत वसंत जाधव (६ वर्ष), सृष्टी ज्ञानेश्वर मालोदे (वय ६ वर्ष), रंगनाथ श्रीपती कुकडे (१० वर्ष), आरती गंगाधर गायकवाड (८ वर्ष), रिया किशोर गायकवाड (८ वर्ष), पृथ्वीराज विजय चव्हाण (१२वर्ष), अभिषेक वाघम्बर तेलंगे (६वर्ष), जुनेद जुबान शेख (११ वर्ष), यश सतीश जाधव (१० वर्ष), नागनाथ किशोर गायकवाड (१० वर्ष), गुरु नरसिंग दाजी (७ वर्ष), अनुजा शिवशंकर स्वामी (९ वर्ष), अंजली संतु राठोड (८ वर्ष), विजय संजय राठोड (सा७वर्ष), विजया संजय राठोड (६ वर्ष) अशी त्यांची नावे आहेत.
डॉ. सी. एस. रामशेट्टे यांनी त्यांच्यावर उपचार केले. या विद्यार्थ्यापैकी सहा विद्यार्थी अंतर्गत विभागात असून त्यांना ताप आहे. मात्र ते लवकरच बरे होतील, असे डॉक्टरांनी सांगितले. खिचडीसाठी वापरण्यात आलेले हरभरे आणि तांदूळ हे निकृष्ट होते, असा आरोप काही गावकऱ्यांनी केला आहे. खिचडीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी केली जावी , अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा