

लातूर; पुढारी वृत्तसेवा : लातूरात नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या तीन मेडीकल दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून नशाकारक व इतर गोळ्यासह 1 लाख 358 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मेडिकल चालकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश धोंडीराम घुगे (वय 37), बालाजी सुरेश मदने (वय 38) आणि रुपीन जयंतीलाल शहा (वय 63) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध धंद्याविरोधात पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी मोहिम उघडकीस आणली. पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेची पथके अवैध धंद्याची माहिती घेत असताना, पथकाला काही व्यक्ती अवैधरित्या, विनापरवाना डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन नसताना नशा करण्यासाठी झोपेच्या गोळ्यांची, गर्भपातकरिता वापरण्यात येणाऱ्या गोळ्या तसेच पुरुषांमध्ये कामवासना वाढविण्यासाठीच्या गोळ्यांची अवैधपणे विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यासह लातूर शहरात विविध ठिकाणी छापा मारून पंचासमक्ष झडती घेतली असता, उपरोक्त गोळ्या त्यांच्या दुकानात आढळल्या.
यातील महेश घुगे याचे पाखरसांगवी शिवारात कुबेर नावाचे मेडिकल स्टोअर्स असून, रुपीन जयंतीलाल शहा याची 'अश्विनी इंटरप्राईजेस' नावाने गांधीमार्केट, लातूर येथे होलसेल मेडिकल दुकान आहे. बालाजी सुरेश मदने हा 'अश्विनी इंटरप्राईजेस' मधून सदरच्या गोळ्या खरेदी करून इतरांना पुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.