

राजापूर, पुढारी वृत्तसेवा: प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे चौथ्या दिवशी काम सुरू आहे. दरम्यान, हे काम बंद करण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलक आज (दि. २८) प्रकल्पस्थळी जमा झाले होते. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
बारसू भागात पोलिसांनी कलम १४४ लागू केले होते. परंतु ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रिफायनरी विरोधात मोर्चा काढण्याच ठरवले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक जमले होते. या आंदोलनाची तयारी करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिकांचा उद्रेक पाहायला मिळाला.
बारसू येथे महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते. तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला.
लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रूधुर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची पळापळ झाली.अश्रू धुर सोडल्याने लोकांना चालता येत नव्हते. समोरचे दिसायचे बंद झाले. अनेकांच्या डोळ्यांना जळजळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वेक्षण स्थळावरून लोकांना हटवले.
दरम्यान, गेल्या ३-४ दिवसांपासून प्रशासन तिथल्या लोकांची चर्चा करत आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. चर्चेला सरकार तयार आहे. शेतकऱ्यांना डावलून सरकार प्रकल्प पुढे रेटणार नाही. गावागावांत जाऊन प्रशासन लोकांच्या शंका दूर करेल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा