महाराष्ट्र केसरी : किरण भगतचे आव्हान संपुष्टात; ‘कुंडी’ डाव फसला

कुस्ती
कुस्ती

सातारा : पुढारी वृत्तसेवा
तब्बल 59 वर्षांनंतर आयोजित केलेली स्पर्धा, दुखापतीतून सावरलेला सातारचा सुपुत्र व 2018 चा उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत अशा दुग्धशर्करा योगात महाराष्ट्र केसरी स्पर्धा दणक्यात सुरू झाली. यंदाचा महाराष्ट्र केसरी किरण भगतच अशी आरोळी ठोकली जात होती. 22 वर्षांनंतर किरण सातार्‍याला महाराष्ट्र केसरीची चंदेरी गदा मिळवून देईल, अशी आशा सातारकरांना होती. मात्र, बुधवारी झालेल्या पहिल्याच चुरशीच्या लढतीत पै. किरण भगतचा धक्‍कादायक पराभव झाला. गोंदियाच्या नवख्या पै. दादा ऊर्फ वेताळ शेळके याने किरणला पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या सातारकरांच्या आशा मावळल्या. सातार्‍यात सुरू असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरीस्पर्धेसाठी चार वर्षांच्या कालावधीनंतर सातार्‍याचा सुपुत्र पै. किरण भगत आखाड्यात उतरला होता. किरणसह अन्य पैलवान जरी आखाड्यात असले तरी त्याची कामगिरी पाहता सातारकरांच्या नजरा किरणवरच होत्या. दुखापतीतून सावरल्यानंतर किरणने राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे 22 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीची गदा किरणच्या खांद्यावर दिसणार असा आशावाद निर्माण झाला होता.

महाराष्ट्र केसरी गटातून पै. किरण भगत माती विभागातून आखाड्यात उतरला होता. किरणने सलामी दिल्यानंतर साताकरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या प्रतिसादाने त्यालाही प्रोत्साहन दिले. किरणची कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती. अपेक्षेप्रमाणे किरणने चपळाईने हालचाल करून शेळके याच्यावर सुरूवातीला 2-1 अशी बढत मिळवली. अनेक वर्षांचा आपला अनुभव पणाला लावत किरणने वेताळ शेळके याला कुंडी डावावर चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, किरणचा हा डाव वेताळ याने उलटवला. याच डावावर वेताळने अवघ्या 10 सेकंदात दोन गुण मिळवले. त्यामुळे किरणला धक्‍कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पै. किरण भगत याचे 4 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेले आगमन आणि सराव होऊनसुद्धा किरणला पट काढण्यात अपयश आले. तर वेताळ हाही नवखा असल्याने एकमेकांना दोघांचा अंदाज आला नाही. या कारणांमुळेच किरणचा पराभव झाला असल्याचे कुस्ती शौकिनांतून बोलले जात आहे.

सातार्‍यात होणार्‍या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपदाचे पंचक पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या भगतचा पहिल्या डावातच पराभव झाला. किरणच्या लढतीकडे सातार्‍याचे नव्हे तर राज्यभरातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून होते. 6 फूट उंची मजबूत देहयष्टी लाभलेल्या या खेळाडूला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चंदेरी गदेने हुलकावणी दिली. किरणचा पराभव झाल्याने सातारकरांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पै. किरणकडून असणार्‍या आशा मावळल्या आहेत.

आज आखाड्यात…

  • सकाळी 7.00 ते 9.30 : अंतिम फेरी व बक्षीस समारंभ त्यानंतर (61 कि., 86 कि. गादी व माती विभाग व महाराष्ट्र केसरीची फेरी)
  • सकाळी 10.00 ते 11 : कुस्तीगीरांची वैद्यकीय तपासणी व वजने (74 कि., 97 कि. गादी व माती विभाग)
  • सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत : कुस्ती स्पर्धा (74 कि., 97 कि. व महाराष्ट्र केसरी फेरी : गादी व माती विभाग)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news