सातारा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्या विठाई या एस.टी बसने आनेवाडी टोलनाक्यानजीक असलेल्या पुलावर सोमवारी सकाळी पेट घेतला. बघता-बघता अवघ्या 20 मिनिटात बस जळून खाक झाली. या थरारक घटनेतून बसमधील 27 प्रवासी बचावले आहेत.
कोल्हापूर विभागातील राधानगरी आगाराची एसटी (क्र. एम.एच.13 सीयु 8413) बस पुण्याकडे निघाली होती. सोमवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास ती पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली. येथील पुलावर असताना बसच्या इंजिनमधून धूर येवू लागला. चालक सागर चौगुले यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने महामार्गावरच बस थांबवली. इंजिनमधून धुराचा लोट वाढू लागला. चालक चौगुले व वाहक सोनल चौगुले यांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात बसने पेट घेतला. बघता बघता बसला ज्वालांनी वेढले. धुराचे लोट व आगीचे रौद्ररूप यामुळे परिसर भेदरून गेला.
अवघ्या 20 मिनिटातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी सातारा पालिका, वाई पालिका व किसन वीर कारखान्याचे बंब दाखल झाले होते. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. प्रवाशांना काही वेळानंतर दुसर्या बसने पुण्याकडे रवाना करण्यात आले. या घटनेमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
अधिक वाचा :