सातारा : अडथळ्यांवर मात करुन राष्ट्रवादीची बाजी

सातारा : अडथळ्यांवर मात करुन राष्ट्रवादीची बाजी
Published on
Updated on

वडूज : पद्मनील कणसे

हुतात्म्यांची नगरी असलेल्या वडूज शहरातील राजकीय वातावरण नगरपंचायत निवडणुकीमुळे कडाक्याच्या थंडीत चांगलेच तापले होते. सत्तेच्या सारीपाटाच्या खेळात अपक्ष व वंचितच्या सदस्यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. अनेक अडथळ्यांंवर मात करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांना यश आले आहे.

नगरपंचायत निवडणुकीमुळे ऐन थंडीत वडूज शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या निवडणुकीत वडूजवासियांनी मतदानाच्या रुपाने कौल देत नगरपालिका सत्तेचा सुकाणू अपक्षांच्या हाती दिला. या निवडणुकीत राष्ट्रवादी पाच, भाजप सहा, अपक्ष चार, वंचित बहुजन आघाडीचा एक, काँग्रेस एक असे सदस्य निवडून आले. नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यानंतर काँग्रेस सोबत आघाडी करून राष्ट्रवादी वडूजमध्ये निवडणूक लढवेल अशी अटकळ सर्वत्र बांधली जात होती.

परंतु अनेक बैठकांनंतर काँग्रेसने वरिष्ठ पातळीवरुन स्वबळावर लढा असे आदेश आल्याचे कारण सांगत राष्ट्रवादी सोबत आघाडी न करण्याची भूमिका घेतली. निवडणुकीला काही दिवसांचाच अवधी असताना अचानक आघाडी होणार नाही हे समजल्यानंतर कमी वेळेत 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी प्रत्येक प्रभागात गाठीभेटी घेत विकासाचा अजेंडा पुढे करत निवडणूक प्रचारात रंगत आणली.

यामुळे कमी जागेवर उमेदवार उभे करून देखील शहरात एकूण मतदानाच्या सरासरी तुलनेत सर्वधिक मते घेणारा पक्ष राष्ट्रवादी ठरला. तसेच ज्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार नाही तेथील अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीने हवी ती रसद पुरवली. निवडणूक निकालानंतर फोडा फोडीचे राजकारण होऊन हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार हे निश्चित असताना तीन अपक्ष व वंचित आघाडीचा एक सदस्य यांनी राष्ट्रवादीने केलेली मदत लक्षात ठेवून हे सदस्य निकालाच्या दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादीच्या ताफ्यात सामील झाले.

त्यामुळे राष्ट्रवादीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. दरम्यानच्या कालावधीत भाजपने देखील सत्तास्थापनेसाठी विविध आयुधांचा वापर केला. मात्र, त्यांची गोळा बेरीज न झाल्याने भाजपच्या रेखा माळी यांनी आपला अर्ज काढत माघार घेतली. या कालावधीत राष्ट्रवादीने सावधगिरीने पावले उचलल्याने सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती राहील्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कत अपक्ष मनिषा काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या सत्तास्थापनेमध्ये ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, प्रा. बंडा गोडसे यांनी मनाच  मोठेपणा दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली.

यांनी बजावली विशेष भूमिका…

वडूजमध्ये निकालानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तास्थापनेसाठी कमलाचे आक्रमक झाल्याचे दिसून आले. यामध्ये माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, पृथ्वीराज गोडसे, विनोद शिंदे, विजय गोडसे, अक्षय थोरवे, तुषार बैले, धनाजी काळे, विकास काळे यांनी आक्रमक होऊन सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्न केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news