मांसाहारी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी प्रयोगशाळेत तयार होणार मटण, चिकन!

मांसाहारी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी प्रयोगशाळेत तयार होणार मटण, चिकन!

सांगली, सुनील कदम : मटण आणि चिकन म्हणजे मांसाहारी भोक्त्यांचा जीव की प्राण! देशातील मांसाहारी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी दिवसाकाठी हजारो मोठी जनावरे, शेळ्या-मेंढ्यांसह बोकड-बकर्‍यांचा, लाखो कोंबड्यांचा बळी दिला जातो. पण भविष्यात मांसाहारासाठी म्हणून कोणत्याही पशू-पक्ष्यांचा बळी द्यावा लागणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण या पशू-पक्ष्यांचा बळी न देता त्यांचेच मटण आणि चिकन आता प्रयोगशाळेत तयार होणार आहे; किंबहुना तयार होऊ लागले आहे. जगभरातील सात-आठ कंपन्यांनी प्रायोगिक तत्त्वावर अशा मांसाचे उत्पादनही सुरू केले आहे. त्याचप्रमाणे सिंगापूरसह अन्य काही देशांमध्ये अशा मांसाची खुली विक्रीही सुरू झालेली आहे.

भारतात मांसाहारी लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 70 टक्के आहे. यापैकी काही लोक दैनंदिन मांसाहार करणारे, काही लोक प्रसंगपरत्वे मांसाहार करणारे तर काही लोक अपवादात्मकरीतीने मांसाहार करणारे आहेत. पुरुषांमध्ये मांसाहाराचे प्रमाण 75 टक्के तर महिलांमध्ये 64 टक्के आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही राज्ये मांसाहारात आघाडीवर आहेत. गाय, बैल, म्हैस, रेडा ही मोठी जनावरे; तर, शेळ्या-मेंढ्या आणि बोकड ही लहान जनावरे मांसाहारासाठी वापरली जातात. याशिवाय देशाच्या काही भागात घोडा, उंट, याक, गाढव, डुक्कर या प्राण्यांचेही मांस खाल्ले जाते.

मांसाहारी खवय्यांसाठी देशात वर्षाकाठी सुमारे 30 कोटी मोठी जनावरे, 23 कोटी शेळ्या-मेंढ्या-बोकड यांचा बळी दिला जातो. मांसाहारात सर्वाधिक पसंती ही चिकनला असलेली दिसते. वर्षाकाठी देशात सुमारे 85 कोटी कोंबड्यांचा बळी दिला जातो. याशिवाय अन्य एक कोटी जनावरांचीही मांसासाठी कत्तल होते. गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगभरातच मांसाहाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मांसाची वाढती मागणी विचारात घेऊन काही कंपन्यांनी कृत्रिम पद्धतीने प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या प्राण्याचे मांस तयार करायला सुरुवात केली आहे. कोणताही प्राणी, पक्षी, जलचर अथवा भूचर प्राण्याचे मांस अशा पद्धतीने बनविले जात आहे.

आठ कंपन्या कार्यरत!

प्रयोगशाळेत मांस बनविणार्‍या आठ कंपन्या सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील सुपर मीट, मोसा मीट, मिटेक, इस्रायलमधील बिलिव्हर्स मीट, अन्य युरोपीय देशातील आलेफ फार्मस्, शिऑक मीटस्, बिफेक, मायक्रो मीट या कंपन्यांचा समावेश आहे. सध्या या ठिकाणी सुरू असलेले मांसाचे उत्पादन हे प्रायोगिक तत्त्वावर होत असले तरी काही कंपन्यांनी प्रयोगशाळेतील या मांसाचा व्यावसायिक वापरही चालू केला आहे. जगभरात अन्नसाखळीसाठी प्रसिद्ध असलेल्या काही कंपन्यांनी असा वापर सुरू केल्याचे दिसत आहे. सिंगापूरसारख्या ठिकाणी तर अशा मांसाचा खुला वापर आणि व्यापारही सुरू झाला आहे.

अनेक सामाजिक सवाल!

प्रयोगशाळेत अशा पद्धतीने मांस तयार होऊ लागले असले तरी याबाबतीत अनेक सामाजिक सवालही उपस्थित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऊती संवर्धन पद्धतीने तयार होणार्‍या या मांसाचे मानवी जीवनावर काही विपरीत परिणाम होणार काय, याबाबत अजूनही सखोल संशोधन झालेले नाही. त्यामुळे त्याच्या वापराबाबत मतभिन्नता दिसून येते. शिवाय अशा पद्धतीने जर प्रयोगशाळेत मांस तयार होऊ लागले तर नैसर्गिक पद्धतीने वाढत जाणार्‍या पशू-पक्ष्यांचे काय करायचे, हाही प्रश्न आहे.

असे बनते हे मटण-चिकन!

ज्या प्राण्याचे मांस बनवायचे आहे, त्या प्राणी-पक्ष्याच्या शरीरातील ठरावीक पेशी घेतल्या जातात. या पेशी प्रयोगशाळेमध्ये पेशी पोषक द्रावामध्ये बुडवून ठेवल्या जातात. परिणामी, त्या पेशी तासागणिक आणि दिवसागणिक वाढत जाऊन मांसाच्या लाद्याच्या लाद्या तयार होऊ लागतात. विशेष म्हणजे पशू-पक्ष्यांच्या ज्या भागाच्या पेशी यासाठी वापरल्या जातात, त्याच भागाच्या वैशिष्ट्यासारख्या मांसाच्या लाद्या तयार होतात. अशा पद्धतीने प्रयोगशाळेत तयार होणार्‍या मांसपेशीमध्ये कोणतेही जनुकीय बदल करण्यात येत नाहीत.

त्यामुळे संबंधित पशू-पक्ष्यांच्या नैसर्गिक मांसाची जी चव असते, नेमकी तशीच चव या प्रयोगशाळेतील मांसाची असते. सध्या मांसाहारासाठी म्हणून आणि लवकर वाढीसाठी काही पशू-पक्ष्यांमध्ये जनुकीय बदल करण्यात आलेले आहेत; पण प्रयोगशाळेत तयार होणारे मटण-चिकन हे त्या त्या पशू-पक्ष्यांच्या मूळ स्वरूपात असणार आहे. तसेच अशा पद्धतीने बनविण्यात येणार्‍या मांसासाठी कोणत्याही पद्धतीच्या अँटी बायोटिकचा वापर होत नसल्यामुळे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या मांसाला वापरण्यास योग्य ठरविलेले आहे. जगातील अन्य काही देशांनीही अशा मांस वापराला परवानगी दिली आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news