औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला ( लसीकरण ) सोमवारपासून (दि.3) सुरवात झाली. पहिल्या दिवशी मराठवाड्यातील बीड आणि औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यात मात्र तरुणांनी उत्साह दाखवला नाही. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 6 हजारांवर तर मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये पावणे सहा हजार तरुणांनी पहिल्या दिवशी लस घेतली.
जानेवारी 2021 मध्ये कोरोनाच्या लसीकरणाचा ( लसीकरण ) प्रारंभ झाला, सुरवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 60 वर्षांवरील वयोवृद्ध, 45 वर्षांवरील आजारी नागरिकांचा समावेश करण्यात आला. या कालावधीत लसीकरणासाठी केंद्रावर फारशी गर्दी होत नव्हती. 18 वर्षांवरील तरुणांसाठीही लसीकरण केंद्रांची दारे खुली केल्यानंतर मात्र केंद्रांवरील चित्र बदलले. तरुणांनी लस घेण्यासाठी दाखविलेला उत्साह अनपेक्षित होता. लसींचा पुरवठा कमी आणि लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
कोरोनाची पहिली लाट जून ते सप्टेंबर-2020 मध्ये आली होती, तर मार्च ते जून-2021 या चार महिन्यात दुसरी लाट येवून गेली. त्यानंतर लस घेण्यासाठी होणारी गर्दी ओसरली. लोकांमधील कोरोनाची भिती गेल्याने लसीकरणासाठी प्रशासनाला सक्तीसाठी पावले उचलावी लागली. या सगळ्या प्रकारानंतरही लसीकरणाचे प्रमाण काही वाढले नाही. लसीकरणाच्या प्रारंभानंतर सुमारे वर्षभराने 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाला सुरवात झाली. यावेळी तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आरोग्य विभागाला होती, मात्र पहिल्या दिवशी काही केंद्रांवर गर्दी तर काही केंद्र ओस पडलेली असल्याचे दिसून आले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद ( लसीकरण )
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 1 लाख 9 हजार 428 जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे. एकूण पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत हि टक्केवारी 0.4 आहे.