गोव्यातील कोरोना नियंत्रणात; आरोग्य खात्याचे सचिव राजशेखर यांची माहिती 

गोव्यातील कोरोना नियंत्रणात; आरोग्य खात्याचे सचिव राजशेखर यांची माहिती 
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येत असून कोरोना सकारात्मकता दरही कमी होत आहे. राज्यात पहिला डोस शंभर टक्के नागरिकांनी घेतलेला असून दुसरा डोसही 98 टक्के पेक्षा जास्त लोकांनी घेतला आहे. पंधरा ते अठरा वर्षांच्या विद्यार्थ्यांनी 82 टक्के कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे, अशी माहिती आरोग्य खात्याचे सचिव राजशेखर यांनी आज मंगळवारी दिली.

कांपाल येथील आरोग्य संचालनालयाच्या सभागृहात दि. 1 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत राजशेखर बोलत होते. यावेळी आरोग्य संचालिका डॉ. आयरा आल्मेदा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याचे कोरोना लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर तसेच आरोग्य खात्याच्या संसर्गित रोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर उपस्थित होते. राज्यात सध्या 216 कोरोना बाधित इस्पितळांमध्ये दाखल असून त्यातील 77 ऑक्सिजनवर आहेत तर 32 आयसीयूमध्ये दाखल असून पाचजण व्हॅटिंलेटरवर असल्याची माहिती आरोग्य संचालिका डॉ. आयरा इल्मेदा यांनी दिली. ओमायक्रोन व डेल्टा तपासणीचे यंत्र गोव्यामध्ये दाखल झालेले असून त्या यंत्रासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण सुरू झालेले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत ते म्हापसा येथील आझुलो हॉस्पिटलमध्ये बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .

बांबोळी येथील सुपरस्पेशलिटी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधीत 112 व्यक्ती दाखल असून त्यातील 15 जण आयसीयूमध्ये आहेत आणि चारजण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 68 कोरोनाबाधीत दाखल असून त्यातील पाचजण आयसीयूमध्ये असल्याचे ते म्हणाले. या दिवसांत जे कोरोनाबाधित मृत्यू पावले त्यातील बहुतांशजणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. गंभीर स्थितीत गोमेकॉमध्ये ते दाखल झाले होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांना उच्च निमोनिया होता असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले. राज्यात लसीकरण जोरात सुरू असून पहिला डोस यापूर्वी शंभर टक्के झालेला आहेच. तर दुसरा डोस 98.99 टक्के झालेला आहे . 15 ते 18 वर्षावरील 81.25 टक्के विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला असून विद्यार्थ्यांना दुसरा डोस देण्याची देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी यावेळी सांगितले.

चोवीस तासांत सहा दगावले

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार दि.1 फेब्रुवारी रोजी 4,648 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जाहीर अहवालानुसार आज 910 नवे कोरोनाबाधित सापडले तर 1,794 कोरोना बाधित बरे झाले आहेत. दिवसभरात 6 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या 3,699 वर पोहोचली आहे. दरम्यान आज 1,790 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 24 लाख 55 हजार 33 एवढे लसीकरण झाले. यात पहिला डोस घेणार्‍यांची संख्या 12,99,717 तर दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या 11,55,616 एवढी झाली आहे. आज पंधरा ते अठरा वर्षे वयाच्या 7,490 विद्यार्थ्यांनी लस घेतली.

पाहा व्हिडिओ: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2022 : जाणून घेऊया प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांच्याकडून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news