पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटांबरोबरच रमेश देव यांनी राजकारणातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. 1996 मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार उदयसिंह गायकवाड यांच्या विरुद्ध ते उभे होते. या निवडणुकीत गायकवाड विजयी झाले. गायकवाड यांना 2 लाख 36 हजार 739 मते मिळाली. देव यांना 1 लाख 68 हजार 414 मते मिळाली. प्रा. एन. डी. पाटील यांना 1 लाख 17 हजार 163 मते मिळाली होती.
देव यांचे मूळ राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. त्यांचे वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब कोल्हापुरात आले. रमेश देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे आडनाव 'देव' झाले. एका न्यायालयीन कामकाजात देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले.
1951 मध्ये 'पाटलाची पोर' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर राजा परांजपे दिग्दर्शित 'आंधळा मागतो एक डोळा'मध्ये त्यांनी पहिल्यांदा खलनायक रंगवला. मराठीत भूमिका करतानाच त्यांच्यासाठी 1962 साली हिंदी चित्रपटसृष्टीचाही पडदा उघडला. राजश्री प्रॉडक्शनचा 'आरती' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
'बिग बी' अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासमवेत केलेल्या 'आनंद' चित्रपटातील रमेश आणि सीमा देव यांची भूमिका अजरामर ठरली. सीमा देव या आपल्या मानलेल्या बहिणीला आशीर्वाद देताना कर्करोगामुळे अखेरचे दिवस कंठत असलेला आनंद (राजेश खन्ना) 'अब तुम्हे क्या आशीर्वाद दू, मैं ये भी तो नहीं कह सकता ना, कि मेरी उमर तुम्हे लग जाये, असे म्हणतो तेव्हा लगतच उभे असलेल्या रमेश देव यांच्या डोळ्यांतील संवादरहित करुण भाव आजही भाव खाऊन जातात.
देव यांच्यासोबत वेल डन भाल्या, सानेगुरुजी आदी चित्रपटांत भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटसृष्टीत मराठी आणि हिंदी दोन्हीत एवढी मोठी कारकीर्द लाभलेले रमेश देव भेटले म्हणजे अतिशय नम्रपणे, आस्थेने चौकशी करायचे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत या दाम्पत्याला फार मोठा आदर मिळाला. अत्यंत शिस्तप्रिय, उत्तम पाठांतर आणि सहकलाकारांची काळजी घेणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते.
– अलका कुबल, अभिनेत्रीदेव मला धाकट्या भावासारखेच मानायचे. मी त्यांना रमेश भय्याच म्हणायचो. 1967 मध्ये माझे चित्रपटसृष्टीतील पहिले चित्रीकरण 'आयलंय दर्याला तुफान' या चित्रपटात त्यांच्यासोबत झाले; पण तो चित्रपट लगेच प्रदर्शित झाला नाही. माझी नाटके, चित्रपट ते आवर्जून पाहायचे. त्याचे कौतुक ते करायचे. माझे आणि त्यांचे नाते खूप छान होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे
– अशोक सराफ, अभिनेता