कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत १ लाख ७२ हजार नवे रुग्ण, १,००८ जणांचा मृत्यू | पुढारी

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत १ लाख ७२ हजार नवे रुग्ण, १,००८ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ७२ हजार ४३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ६.८ टक्क्यांनी अधिक आहे. तर २४ तासांत १,००८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांचा आकडा ४ लाख ९८ हजार ९८३ एवढा झाला आहे. सध्या देशात १५ लाख ३३ हजार ९२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.९९ टक्के आहे.

देशातील कोरोना मृत्यूचा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. मंगळवारी दिवसभरात १ हजार ७३३ रूग्णांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी दिवसभरात १ हजार १९२ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत झालेली वाढ चिंता वाढवणारी आहे. दरम्यान, मंगळवारी १ लाख ६७ हजार ५९ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २ लाख ८१ हजार १०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९४.९१ टक्के नोंदवण्यात आला. तर, आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १४.१५ टक्के आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ९.२६ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १६७ कोटी ८७ लाख डोस देण्यात आले आहेत. यातील ५७ लाखांहून अधिकचे डोस मंगळवारी दिवसभरात देण्यात आले. कोरोना महारोगराईचा वाढता प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत १.३० कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

जर्मनीत १ लाख १८ हजार मृत्यू तर मेक्सिकोतील मृतांचा आकडा ३ लाखांवर

जर्मनीत कोरोनाचा धोका वाढला आहे. रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, जर्मनीत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख १८ हजार ३३४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मेक्सिकोत कोरोनामुळे आणखी ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथील मृतांचा आकडा ३ लाख ७ हजार ४९३ वर पोहोचला आहे.

Back to top button