पुढारी ऑनलाईन, हिंगोली : सेनगाव ते येलदरी मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १२) पहाटे घडली आहे. सचिन पवार ( २५ ) तेजस पाईकराव (२२, दोघे रा. खानापूरचित्ता ता. हिंगोली ) अशी मयत तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील सचिन पवार व तेजस पाईकराव हे दुचाकीवरून सेनगावकडे गेले होते.
आज पहाटेच्या सुमारास येलदरी मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या पाटीला धडक देऊन दोघेही दुचाकीसह पुलाखाली पडले.
या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच सेनगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांची ओळख पटत नव्हती.
त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइलवरून संपर्क साधला. त्यानंतर या दोघांची ओळख पटली.
खानापूर येथील पत्रकार अर्जुन पवार, दत्तराव पवार यांच्यासह गावकरी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
दरम्यान शनिवारी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते दोघेही घरून निघाले होते अशी प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
घटनास्थळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे जमादार अनिल भारती, शिवदर्शन खांडेकर यांचे पथक दाखल झाले आहे.
दरम्यान सचिन पवार हा औरंगाबाद येथे एका खासगी कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो खानापूरचित्ता येथे गावी आला होता.
महालक्ष्मीच्या सणासाठी तो गावी थांबला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
तर तेजस पाईकराव हा सर्प मित्र होता त्यांना आतापर्यंत सुमारे दोनशे पेक्षा अधिक सापांना पकडून जीवदान दिले आहे.
सेनगाव – येलदरी महामार्गावरील सुरू असलेल्या सदरील पुलाचे बांधकाम रेंगाळले आहे. ज्या गतीने हे बांधकाम व्हायला हवे होते त्या गतिने ते होत नाही.
हा पूल अत्यंत धोक्कादायक बनलेला आहे. दोन ते तीन महिन्यापूर्वी शाळेचे साहित्य घेवून जाणारी एक चारचाकी वाहन या पुलावरून कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर संबंधित ठेकेदाराने दोन ते तीन दिवस आवश्यक ती खबरदारी घेतली. मात्र, त्यानंतर सदरील पुलावर बांधकाम सुरू असल्याचे कोणतेही फलक लावले नाही.
त्यामुळे रविवार रोजी दुसरी दुर्घटना घडली. या पुलावरून पडून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर
आणखी किती जणांचा जीव घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मयतातील दोघांपैकी एकाने भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने चालवून त्याचे स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरले.
म्हणून फिर्यादी चंद्रभान पि. माधवराव पाईकराव यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.
हेही वाचा :