पुणे; हिरा सरवदे : पुणे महापालिकेकडून करण्यात आलेले रस्ते, चौक, उड्डाणपूल, उद्याने, विविध इमारतींना नातेवाईकांची आणि आपल्या नेत्यांची नावे देण्याची नगरसेवकांमध्ये एक प्रकारची स्पर्धाच सुरू आहे. पुणे महापालिकेच्या नाव समितीने गेल्या अडीच वर्षात मंजूर केलेल्या सुमारे चारशे नावांमध्ये शंभराहून अधिक नावे नगरसेवकांच्या नातेवाईकांची आहेत. त्यामध्ये सत्ताधारी नगरसेवक आघाडीवर आहेत. त्यामुळे जनतेच्या पैशावर नगरसेवकांच्या रेघोट्या ओढल्याचे दिसून येत आहे.
नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात त्यांच्या सूचनेनुसार विकास कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद दरवर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात केली जाते. त्याला 'स' यादी असे म्हटले जाते. महापालिका आयुक्तांनी सुचविले नसताना, स्थायी समितीमार्फत ही 'स' यादी बनवली जाते.
हा निधी मुदतीत संपवण्यासाठी नगरसेवक वेगवेगळे फंडे शोधतात. ते स्वतःच्या कामासह महापालिकेने केलेल्या कामाच्या ठिकाणी आणि प्रभागातील विविध वास्तूंवर संकल्पना म्हणून स्वतःची नावे देतात.
विशेष म्हणजे पूर्वीचा नामफलक असतानाही केवळ नावासाठी नवीन फलक उभारले जातात. त्यातच एका प्रभागात चार नगरसेवक असल्याने सर्वत्र नामफलकांचा सुळसुळाट पाहायला मिळतो.
शासकीय निधीतून उभारलेल्या वास्तूंवर राजकीय पक्षाचे अस्तित्व असून नये, असे संकेत असताना नगरसेवकांकडून सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जाते.
पुणे पालिकेच्या पैशातून उभारलेल्या वास्तुंवर राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह, पक्षाच्या झेंड्याचे रंग, घटनात्मक पद नसलेल्या व्यक्तींची नावे आणि फोटो वापरले जातात.
वरील चित्र पुणे शहरात सर्वत्र दिसत असताना नगरसेवक शहरातील रस्ते, चौक, उड्डाणपूल, विविध पुल, पाण्याच्या टाक्या, भाजी मार्केट, उद्याने, मैदाने, क्रिडा संकुल, व्यायाम शाळा, अभ्यासिका, वाचनालये, शाळांच्या इमारती, सभागृह, विरंगुळा केंद्र, बहुउद्देशिय केद्र, कर संकलन इमारती आदींना नावे सुचविताना केवळ आपल्या घरातील दिवंगत व जिवंत व्यक्तींची नावांना आणि पक्षाच्या नेत्यांच्या नावांना प्राधान्य देत असल्याचे दैनिक पुढारीच्या पाहणीत समोर आले आहे.
नाव समितीच्या जानेवारी 2019 पासून एप्रिल 2021 पर्यंत झाल्या विविध 13 बैठकांमध्ये नाव देण्याचे 380 प्रस्ताव मंजूर केले. या प्रस्तावांना मुख्य सभेचीही मंजुरी मिळाली आहे.
या प्रस्तावांमध्ये 30 टक्के म्हणजे 113 प्रस्ताव हे नगरसेवकांच्या नातेवाईकांची व नेत्यांची नावे देणारे आहेत. मंजुर केलेल्या प्रस्तावांमध्ये सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रस्तावांची संख्या अधिक आहेत.
हडपसर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातील उड्डाणपूल, कर्वे रस्त्यावरील नियोजित उड्डाणपूल आणि गणेशखिंड रस्त्यावरील म्हसोबा मंदिर चौकातील उड्डाणपुल अशा तीन उड्डाणपुलांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.
यातील एका उड्डाणपुलाच्या ठिकाणी लावलेल्या नामफलकावर 'साहेब' असा उल्लेख केला आहे. शिवाय त्यावर संविधानिक किंवा लोकप्रतिनिधी नसलेल्या नेत्याचेही नाव टाकण्यात आले आहे.
या शिवाय वाजपेयी यांचे नाव क्रिडा संकुल, शाळा, विरंगुळा केंद्र आदींना देण्यात आले आहे. या शिवाय भाजपच्या इतर नेत्यांचीही नावे विविध ठिकाणी देण्यात आली आहेत.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे नाव मिठानगर डीपी रस्ता, शिवनेरी ते ब्रम्हा इस्टेट डीपी रस्ता आणि हांडेवाडी ते महम्मदवाडी डीपी रस्ता अशी तीन रस्त्यांना देण्यात आले आहे.
नाव समितीला प्राप्त झालेल्या काही प्रस्तावांवर प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला. यात प्रशासनाने 17 प्रस्तावांना सकारात्मक आणि 45 प्रस्तावांना नकारात्मक अभिप्राय दिले. नकारात्मक अभिप्राय दिलेल्या प्रस्तावामध्ये अनेक प्रस्ताव पूर्वी नाव दिलेले व काम पूर्ण होण्यापूर्वीच नाव देण्याचे होते.
तर 9 प्रस्ताव दप्तरी जमा केले असून 1 प्रस्तावर सभासदाने मागे घेतला आहे. यातील काही प्रस्ताव मतदानाच्या जोरावर मंजूर केले तर काही फेटाळण्यात आले.
नगरसेवकांच्या नातेवाईकांची नावे देण्याचे सर्वाधिक प्रस्ताव कर्वेनगर, बालेवाडी, आंबेगांव, टिंगरे नगर, भवानी पेठ, कात्रज या परिसरातील मंजूर करण्यात आले आहेत. या परिसरातील माननीयांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तींची नावे विविध वास्तूंना सुचवून ती मंजुर करून घेतली आहेत.
19.01.2019 – 43 – 21
20.02.2019 – 27 – 05
20.06.2019 – 31 – 08
13.08.2019 – 20 – 06
18.11.2019 – 32 – 05
11.12.2019 – 12 – 07
20.01.2020 – 13 – 06
17.02.2020 – 12 – 03
06.03.2020 – 11 – 05
15.02.2021 – 62 – 12
18.02.2021 – 28 – 11
19.03.2021 – 38 – 13
30.04.2021 – 51 – 11
——————————
एकूण – 380 – 113