नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड पुढील वर्षापासून

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड पुढील वर्षापासून

मुंबई पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेत आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या कार्डवर लोकल तसेच मेल-एक्स्प्रेसची तिकिटे प्रवाशांना काढता येणार आहेत. या कार्डची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच कार्डसाठी आवश्यक यंत्रणा बसविण्याच्या निविदा ऑगस्टमध्ये काढल्या जाणार आहेत. बेस्टन एप्रिल महिन्यात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू केले आहे.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमुळे प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटासाठी खिडक्यांपुढे रांग लावावी लागणार नाही. या योजनेसाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प खासगी तत्त्वावर राबवण्यात येणार असून, रेल्वेला निधी खर्च करावा लागणार नाही . निविदेत पात्र ठरलेल्या बँकेवर उपनगरी रेल्वेच्या तब्बल 80 लाख प्रवाशांना मनॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड देण्याची जबाबदारी असेल.

एमआरव्हीसीने 2019 मध्येच रेल्वे बोर्डाला नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली. परंतु मार्च 2020 पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संक्रमणामुळे हा प्रस्ताव रखडला. परंतु आता या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. हे कार्ड मार्च 2023 पर्यत प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे एमआरव्हीसीचे नियोजन आहे. बेस्टच्या कार्डला जानेवारी 2023 पर्यत रेल्वेच्या कार्ड सर्व्हरशी जोडण्याची योजना एमआरव्हीसीने आखली आहे. यामुळे बेस्टचे कार्ड असलेले प्रवासी देखील लोकलचे तिकिट खरेदी करू शकतील. एमआरव्हीसीतर्फे मोबाईल अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे प्रवासी आपल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये किती शिल्लक रक्कम आहे, आपले तिकीट कोणते आहे आदी माहिती पाहू शकतील. या कार्डच्या मदतीने प्रवाशांना रेल्वे, बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षाचा प्रवास आणि खरेदी करता येईल.

रेल्वे स्थानकांवर लागणार कार्ड रीडर

सर्व रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर कार्ड रीडर बसवले जाणार आहेत. प्रवाशांनी कार्ड रीडरवर कार्ड टॅप केल्यानंतर कार्डमधून पैसे कापून तिकीट तयार केले जाईल. तिकीट तपासणीसाठी, तिकीट तपासनीसांना हातातील उपकरणे दिली जातील. याशिवाय उपनगरी रेल्वे मार्गावरील एकूण 119 स्थानकांत किमान 600 मशीन लागतील. या कार्डवरून दिवसभरात होणार्‍या तिकीट आणि मासिक पासच्या विक्रीची माहिती रेल्वेला प्रशासनाकडून रात्री संबंधित बँकेला दिली जाईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news