नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान

नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसरात गुरुवारी (दि.4) सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. तासभर झालेल्या या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने कार्यालयांमधून घरी परतणार्‍या चाकरमान्यांची दैना उडाली. शहरात 27.2 मिमी पर्जन्याची नोंद झाली.

पोलिस आयुक्त कार्यालय मार्ग
पोलिस आयुक्त कार्यालय मार्ग

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार आगमन केले. दिवसभर कडक उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी 4.45 च्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले अन् अवघ्या काही मिनिटांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने शहरातील सखल रस्त्यांवर पाण्याची तळी साचली. शहराचा मुख्य भाग असलेल्या गडकरी सिग्नल, त्र्यंबक नाका, गंगापूर रोड, टिळकवाडीतील रामायण बंगला, मनपा मुख्यालयासमोर तसेच दिंडोरी रोडवर बाजार समिती आदी परिसरांत गुडघाभर पाणी साचल्याने त्यातून मार्गक्रमण करताना पादचार्‍यांची धांदल उडाली होती. व्यापारी संकुलांच्या बेसमेन्टमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.

गोळे कॉलनी(छाया-हेमंत घोरपडे)
गोळे कॉलनी(छाया-हेमंत घोरपडे)

शहरातील पंचवटी परिसर, नाशिकरोड, सिडको, सातपूर व इंदिरानगर आदी उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे वाहतूक सेवा मंदावली. रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. अचानक आलेल्या पावसाने कार्यालयांमधून घरी परतणार्‍या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. रस्त्यावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना फटका बसला. दरम्यान, पुढील चार दिवस जिल्ह्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पंचवटी : 
अचानक आलेल्या पावसामुळे पंचवटी परिसरात नागरिकांसह, व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (दि. 4) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगर, ड्रिम कॅसल चौक, मालेगाव स्टॅण्ड, दिंडोरी रोड, आडगाव नाका, औरंगाबाद नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, नाग चौक, गजानन चौक, सरदार चौक, पेठ नाका, रामवाडी, हनुमानवाडी, निमाणी, सेवाकुंज, अमृतधाम चौक, पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डसमोरील परिसर, मेहेरधाम, तारवालानगर, मेरी, म्हसरूळ, हिरावाडी रोड, कार्यसिद्धी चौक, नांदूर नाका, जत्रा हॉटेल चौक तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मार्गासह चौका चौकांत पाण्याचे तळे साचले होते. गोदाघाट परिसरही जलमय झाला होता.

पंचवटी : अचानक आलेल्या पावसाने दिंडोरी रोडवर गुडघ्याभर पाण्यातून वाट काढताना नागरिक.(छाया : गणेश बोडके )
पंचवटी : अचानक आलेल्या पावसाने दिंडोरी रोडवर गुडघ्याभर पाण्यातून वाट काढताना नागरिक.(छाया : गणेश बोडके )

येथील व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली. पादचारी व दुचाकीस्वारांना साचलेल्या पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते. पावसाने दरवर्षी याच परिसरात वर्षानुवर्षे तळे साचत असते, मात्र नाशिक महापालिकेतील संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसून, याकडे डोळेझाक केली जाते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पावसाळी कामांच्या घोषणा व दुरुस्तीच्या लाखो रुपयांच्या निविदा काढल्या जातात. मात्र वर्षानुवर्षे परिस्थिती 'जैसे थे' राहते. स्मार्ट सिटी विभागातून होणार्‍या कामांबाबतदेखील तिच परिस्थिती दिसून येते. पंचवटीत ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत, त्या त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात विश्रांती
नाशिक शहरात एकीकडे पावसाने हजेरी लावली असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्याने विश्रांती घेतली. अनेक तालुक्यांमध्ये दिवसभर ढगाळ हवामान असले तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news