नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मशिदींमधून पहाटेच्या अजानीच्या भोंग्यांचा आवाज बंद तसेच कमी झाला होता. मात्र, आता अनेक ठिकाणी भोंग्यांचे आवाज पूर्ववत सुरू झाल्याने संबंधितांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी, अशी मागणी मनसेतर्फे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

नाशिक : पोलिस आयुक्तांना निवदेन देताना मनसेचे पदाधिकारी.
नाशिक : पोलिस आयुक्तांना निवदेन देताना मनसेचे पदाधिकारी.

याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले. पहाटेच्या अजानीचे भोंगे बंद झाल्याने सर्वांनीच सहकार्याची भावना जोपासली होती. मात्र सण, उत्सव सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पहाटेच्या अजानचे भोंगे वाजू लागल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचे मनसेने पत्रात म्हटले आहे. सणासुदीच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण करण्याच्या देश विघातक शक्तींचा यात सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला आहे. विविध न्यायालयांत मशिदींवरील भोंग्यांमधून उच्च स्वरातील घोषणांमुळे सार्वजनिक शांतता भंग पावत असल्याबाबत जनहित याचिकांवर खंडपीठांनी मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजासाठी कडक निर्बंध ठरवून दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 18 जुलै 2005 च्या जनहित याचिकेवरील निकालात ध्वनिप्रदूषणामुळे व्यत्यय येत असून, मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने 26 जून 2018 च्या निकालात लाऊडस्पीकरसाठी पाच डेसिबल मर्यादा निश्चित केली आहे. त्याच धर्तीवर मशिदींवरील भोंगे काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख, शहर समन्वयक सचिन भोसले, प्रवक्ता व शॅडो केबिनेट सदस्य पराग शिंत्रे, संदीप भवर, संतोष कोरडे, सचिन सिन्हा, विजय आहिरे, गणेश कोठुळे, अक्षय खांडरे, विनायक पगारे, भाऊसाहेब ठाकरे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, नितीन साळवे, योगेश लभडे, नितीन माळी, अतुल पाटील, विजय आगळे, संदीप दोंदे, पंकज दातीर, विनोद नवले आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news