नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडला पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (दि. १५) पारा थेट ६.५ अंशांपर्यंत खाली आल्याने अवघ्या तालुक्याला हुडहुडी भरली आहे. मागील २४ तासांमध्ये नाशिकच्या पाऱ्यात तब्बल ४.३ अंशांनी घसरण होऊन तो ११.१ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे शहरात थंडीचा जोर वाढला आहे.
हिमालयामधील बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतामधील अनेक राज्यांवर झाला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली तसेच उत्तर प्रदेशात पारा थेट ५ अंशांखाली आला आहे. त्यामुळे उत्तर भारत गारठला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे वेगाने महाराष्ट्राकडे सरकत आहे. परिणामी उत्तर महाराष्ट्र त्यातही विशेष करून नाशिक जिल्ह्याच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. निफाड तालुक्याच्या पाऱ्यात २४ तासांत ५.७ अंशांची घसरण होत पारा थेट ६.५ अंशांपर्यंत खाली आला आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा फटका द्राक्षबागांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे.
नाशिक शहराच्या तापमानातही घसरण झाली आहे. पहाटेच्या वेळी शहर धुक्यात हरवत असून, दिवसभर हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात घामाच्या धारा सहन करणारे नाशिककर आता गुलाबी थंडीची अनुभूती घेत आहेत. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. तसेच शेकोट्याही पेटविण्यात येत आहेत. दुसरीकडे मालेगाव, सिन्नरसह अन्य तालुक्यांतही थंडीचा कडाका वाढला आहे. दैनंदिन जीवनमानावर त्याचा परिणाम होत आहे. वाढत्या गारव्यामुळे भाजीपाला व अन्य पिके धोक्यात येण्याची शक्यता असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान, येत्या दाेन ते तीन दिवसांमध्ये थंडीचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बागा वाचविण्यासाठी धावपळ
वाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसण्याची भीती वर्तविली जात आहे. पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्यासह फळपिकात साखर उतरण्यासह त्याची फुगवण प्रक्रिया मंदावणार आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतातुर झाले आहे. बागा वाचविण्यासाठी पहाटे शेकोट्या पेटविण्यासह द्राक्षघडांना कापडाने व कागदाचे वेष्टण घातले जात आहे.
हेही वाचा :