जळगाव महापूर : ३८ गावे बाधित, पावसाने घेतली उसंत

जळगाव महापूर :  ३८ गावे बाधित, पावसाने घेतली उसंत

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव महापूर : जिल्ह्यातील चाळीसगाव शहरासह गावांना पुराने वेढले होते मात्र पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून, प्रशासनाने जोमाने कामे व मदत कार्य सुरू केले आहे. पूरपश्‍चात परिस्थितीत स्वच्छता, मदत आणि पुनर्वसनाचे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.  तितुर, डोगरी नदीला आलेल्या पुरामुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगावमधील एकूण ३८ गावे बाधीत झाली आहे. ६६१ पशूहानी झाली असून ६७५ घराची अंशतः व पूर्ण घराची पडझड झाली आहे. ३०० दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे मंगळवारी चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला हाेता. मात्र रात्रभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

काल दिवसभर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडतच असल्याने सर्वच जण धास्तावले होते. तथापि, सायंकाळपासून पावसाने बर्‍याच प्रमाणात उसंत घेतली आहे. रात्रभरातून तर तालुक्यात कुठेही मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त नाही.

यामुळे बहुतांश ठिकाणी शिरलेले पुराचे पाणी आता ओसरल्याचे दिसून येत आहे. खोलगट भागांमध्ये अद्यापही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. तर, शेतांमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.

एसडीआरएफचे पथक अव्याहतपणे कार्यरत

दरम्यान, कन्नड घाटात काल सकाळपासून सुरू असलेले रस्ता मोकळा करण्याचे काम आज सकाळी देखील सुरूच असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एसडीआरएफचे पथक अव्याहतपणे कार्यरत असल्याने रस्ता मोकळा करण्याच्या कामाला वेग आला आहे.

मात्र आजही महामार्ग पूर्णपणे खुलणार की नाही ? याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. एकंदरीत पाहता पावसाने उसंत घेतल्याने चाळीसगाव तालुकावासियांना बर्‍याच प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

आता प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी

चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे. आज रात्री निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी जाहीर आहे.

उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ३१ रोजी पहाटे सुमारे २.०० ते ३.०० वाजे दरम्यान अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळली असुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी एसडीआरएफचे धुळे येथील पथक कार्यरत आहे.

कालपासून चाळीसगाव तालुक्यातील तितूर व डोंगरी नदीला पूर आलेला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील खालील नमूद गावे आणि चाळीसगाव शहरातील सखल भागातील  घरांत पाणी शिरले आहे.

चाळीसगाव शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तेथील लोकांची तात्पुरती व्यवस्था ए.बी. हायस्कूल व उर्दू हायस्कुल चाळीसगाव मध्ये करण्यात आलेली आहे.

तसेच त्यांचे जेवणाची व्यवस्था चाळीसगाव नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ३२, पाचोर्‍यातील  ४ तर भडगावमधील २ असे एकूण ३८ गावे बाधीत झाली आहेत.

यात १ जणांचा बळी गेलेला आहे. अतिवृष्टीमुळे १५५ लहान तर ५०६ मोठी गुरे वाहून गेली आहेत.

जोरदार पावसामुळे ३८ घरे पूर्ण तर ६३७ घरे अंशत: वाहून गेली आहेत.

पाण्यामुळे ३०० दुकानांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज या अहवालात वर्तविण्यात आलेला आहे.

अतिवृष्टीमुळे १५९१५ हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येत्या आठवडाभरात नुकसानीची पूर्ण माहिती घेतली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news