चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात गाढ झोपेत असलेल्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेवर पट्टेदार वाघाने घरात घुसून हल्ला चढविला. या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावात (दि. २७) मध्यरात्री घडली. तुळजाबाई परसराम पेंदाम (वय-८९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने चिकमारासह इतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतग्रत् तांबेगडी मेंढा उपक्षेत्रात चिकमारा गाव आहे. ८५४ लोकसंख्या असलेल्या छोट्याशा खेडेगावासभोवती जंगल आहे. याच जंगलात हिंस्र श्वापदांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या सुमारास थेट गावात येऊन जनावरांचा बळी वन्यप्राणी घेत असतात. हा प्रकार सुरू असताना काल बूधवारी चिकमारा येथील तुळजाबाई परसराम पेंदाम झोपल्या होत्या. या महिलेचे घर हे गावाच्या एका टोकाला असून तलावालगत आहे.
दोन खोल्याच्या घरी एक म्हातारी, एक मुलगा, एक सून, तीन नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी मध्यरात्री एका पट्टेदार वाघाने त्या म्हाताऱ्या महिलेच्या खोलीत प्रवेश केला. एकटीच झोपून असलेल्या ८९ वर्षीय तुळजाबाईवर हल्ला चढवून ठार केले. यावेळी मुलगा सुन आणि नातवंडे हे दुसऱ्या खोलीतच झोपून होते. वाघाने हल्ला चढविताच म्हातारीने आरडाओरड केला. आरडाओरडीचा आवाज मुलाला लक्षात येताच ते जागे झाले असता वाघ पळून गेला. अंगणात मुलाला वाघ दिसून आला. मात्र, म्हातारी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती सिंदेवाही वनविभागाला देण्यात आली. वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर आणि त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार घारे हेही आपल्या ताफ्यासह रवाना झाले. घटनास्थळी महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. आज गुरूवारी सकाळी संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह उत्तरतपासणीकरीता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला.
या घटनेने चिकमारा आणि परिसरातील गावात गावात प्रचंड दहशत पसरली आहे. अंगणात झोपलेल्या एका वृद्धाची अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सिंदेवाही तालुक्यात चिकमारा येथे थेट पट्टेदार वाघाने घुसून ठार केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाच्या वतीने तुळजाबाई पेंदाम ह्या महिलेचा घरीच पट्टेदार वाघाने बळी घेतल्याने वनविभागाच्या वतीने तातडीने २५ हजारांची मदत करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून गावाच्या दिशेने सुरू असलेला वाघांचा वावर थांबविण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. जंगलव्याप्त गावात वाघांचा वावर हा नित्याचा झाला असून पाळीव जनावरे, कोंबड्या बकऱ्या यांचा फडशा पाण्यासाठी बिबटे, वाघ मोठ्या प्रमाणात आता गावात रात्रीच्या सुमारास येत आहेत.