कोल्हापूर ‘उत्तर’साठी ६१.१९ टक्के मतदान

कोल्हापूर ‘उत्तर’साठी ६१.१९ टक्के मतदान

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील प्रतिष्ठा पणाला लागलेल्या व संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सुमारे 61.19 टक्के मतदान झाले. कार्यकर्त्यांतील चुरशीमुळे काही मतदान केंद्रांवर वादावादी, घोषणाबाजी झाली. त्यामुळे वातावरण तंग झाल्याच्या काही घटना घडल्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. कोल्हापूरचे 'उत्तर' कोण याचा निकाल शनिवारी (दि. 16) होणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसची जागा कायम ठेवण्याचे तर जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलवण्याचे आव्हान या दोन्ही नेत्यांपुढे आहे. आजी-माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांपासून ते आजी-माजी मंत्री, खासदार, आमदारांपर्यंत नेत्यांच्या फौजा कोल्हापूरच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. यामुळे आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक चांगलीच गाजली. आता मतदारांनी कौल कुणाला दिला हे शनिवारी मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. 357 केंद्रांवर मतदान झाले. काही केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त होता. सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग संथ राहिला. सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.96 टक्के इतके मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 34.18 पर्यंत गेली. कडक उन्हातही भर दुपारी काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः महिला मतदारांची गर्दी होती. दुपारनंतरच महिला मतदानासाठी घराबाहेर पडल्या. सदर बाजार, मंगळवार पेठ, यादवनगर परिसरातील मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.

पहिल्या सहा तासांत दुपारी एक वाजेपर्यंत 34 टक्केच मतदान झाल्याने कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्याचा वेग वाढविला. विशेषत: गठ्ठा मतदान, पारंपरिक हक्‍काचे मतदार यांचे मतदान झाले की नाही याची माहिती घेऊन संबंधितांशी संपर्क करत, काही ठिकाणी वाहनांची व्यवस्था करत मतदारांना बाहेर काढले जात होते. यामुळे काही मतदान केंद्रांवर अखेरच्या दोन तासात मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती.

शेवटच्या 5 तासांत 28 टक्के मतदान

सायंकाळी सहा वाजता मतदानाची प्रक्रिया संपली. शेवटच्या पाच तासांत 28 टक्के मतदान झाले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी 61.19 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.

'ईव्हीएम'ला तिहेरी सुरक्षा कवच

शनिवारी (दि. 16) सकाळी आठ वाजता राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात मतमोजणी सुरू होणार आहे. 15 टेबलवर 24 फेर्‍यांत मतमोजणी होईल. ईव्हीएम मशिन्स मतमोजणी केंद्रांवरील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या स्ट्राँगरूमला सीआयएसएफ, एसआरपीएफ, स्थानिक पोलिस अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.

पुरुषांचे 64 टक्के; महिलांचे 58 टक्के मतदान

रात्री उशिरापर्यंतच्या आकडेवारीनुसार पुरुष मतदारांचे सर्वाधिक मतदान झाले होते. 93 हजार 692 पुरुषांनी मतदान केले आहे. हे प्रमाण 64.27 टक्के इतके आहे. 84 हजार 848 महिला मतदारांचे मतदान झाले आहे. हे प्रमाण 58.11 टक्के इतके होते. गतनिवडणुकीच्या तुलनेत पुरुष आणि महिला मतदारांची यावर्षीची टक्केवारी कमीच आहे.

कसबा बावड्यात सर्वाधिक; सीबीएसवर कमी मतदान

कसबा बावड्यातील केंद्र क्रमांक 15 भारतवीर सामाजिक सभागृह येथे सर्वाधिक मतदान झाले. या ठिकाणी 80.88 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. केंद्र क्रमांक 90, मध्यवर्ती बसस्थानक येथील विभाग नियंत्रक ऑफिस हॉल येथे सर्वात कमी 41.99 टक्के इतके मतदान झाले आहे.

गत निवडणुकीच्या तुलनेत 0.32 टक्क्यांनी वाढ

ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत 60.87 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी केवळ 0.32 टक्के इतकी अल्प वाढ झाली.

एका केंद्रावर व्हीव्हीपॅट बदलले

केंद्र क्रमांक 220 मध्ये व्हीव्हीपॅट मशिन बंद पडले होते. ते तत्काळ बदलण्यात आले. यामुळे काही वेळ थांबलेली मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. हा किरकोळ अपवाद वगळता सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news