ईश्वरचा ऊसतोडीचा विक्रम; १२ तासात १७ टन ३०० किलो ऊस तोडला

ऊसतोडीचा विक्रम
ऊसतोडीचा विक्रम

जत ; पुढारी वृत्तसेवा खैराव (ता.जत) येथे एकाने तळपत्या उन्हात बारा तासांत तब्‍बल १७ टन ३०० किलो ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे. त्‍या ऊसतोड मजुराचे नाव ईश्वर सांगोलकर असे आहे. या ऊसतोड मजुराचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा विक्रम समजताच ऊसतोड मजुराचा उसाच्या फडात जावून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सत्कार केला. यावेळी माजी सरपंच मारुती जमदाडे, उपसरपंच विश्वास खिलारे, नवनाथ चौगुले आदी उपस्थित होते.

यांत्रिकीकरणाच्या युगात अंग मेहनतीच्या बळावर ऊसतोडीचा विक्रम करणारे ईश्वर सांगोलकर हे गेली वीस वर्षापेक्षा अधिक काळ ऊस तोड करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यावेळी त्यांच्याकडून ऊसतोड मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्या. अंग मेहनत करणाऱ्या ऊसतोड मजुरांना शासनाकडून सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
वारणा पट्टयात १२ तासात १६ टन ऊसतोडीला विक्रम पाठीशी असलेल्या खैरावचे सुपुत्र ईश्वर सांगोलकर यांना आपल्या भागात ऊसतोडीचा विक्रम करण्याचा मानस होता. वाहन मालक नवनाथ चौगुले यांना त्यांनी आपला मनोदय बोलून दाखवत एका दिवसात एकटा किती टन ऊसतोड करतो बघा असा आग्रहच ईश्वर सांगोलकर यांनी धरला. वाहन चालक नवनाथ चौगुले यांनीही ईश्वर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

चार दिवसांपूर्वी खैरावमध्येच पांडुरंग चौगुले यांच्या मालकीचा ऊस तोडण्याचे ठरले. ईश्वर सांगोलकर या अवलियाने सकाळी सहा वाजता हातात कोयता घेवून ऊसतोडीस सुरुवात केली. पांडुरंग चौगुले यांच्या शेतात ईश्वर सांगोलकर यांचा कोयता आपला चमत्कार दाखवत होता. बारा तासात १७ टन ३०० किलो ऊस एकट्या पट्टयाने तोडला. या विक्रमाबद्दल राजारामबापू कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी भेटून ईश्वरचा सत्कार केला आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news