इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र दादरला सुरू

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र दादरला सुरू
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरातही इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिकेने दादरला कोहिनूर टॉवरमध्ये पहिले सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात 24 तासात 72 दुचाकी, चारचाकी वाहने चार्ज होऊ शकतात. यासाठी प्रतियुनिट 15 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी मुंबईकरांचा कल वाढत आहे. प्रदूषणमुक्त वाहने महापालिकेनेही आपल्या अधिकार्‍यांसाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांची इलेक्ट्रिक वाहनबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी स्वतः चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दादर येथे शिवसेना भवनजवळ असलेल्या कोहिनूर टॉवरमध्ये पालिकेचे मोठे वाहनतळ असून या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. चार्जिंग, ऑनलाइन आरक्षण, गाडी धुणे आणि पॉलिश, ड्रायव्हर्सना बसण्यासाठी जागा आणि उपाहारगृह या केंद्रात असणार आहे. अशाप्रकारे सर्व सुविधा देणारे हे मुंबईतील पहिले
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र आहे. या केंद्रात सर्व ब्रॅण्डची दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे विजेवर चालतात. त्याचा खर्च कमी असतो. वाहने चार्ज करण्यासाठी ईव्ही चार्जरचे दोन प्रकार असून यापैकी डीसी चार्जर जलद चार्जर, औद्योगिक क्षेत्रात वापरले जाते. ते एक ते दीड तासात वाहन पूर्ण चार्ज करते. तर एसी चार्जर इलेक्ट्रिक वाहन सहा तासात चार्ज करते. कोहिनूर टॉवरमध्ये दोन डीसी जलद चार्जर बसवले आहेत. एकावेळी चार वाहने चार्ज होतील. तर 3 एसी चार्जर असून येथे एकावेळी तीन वाहने चार्ज होतील. वाहन पूर्ण चार्ज होण्यासाठी 20 ते 30 युनिट्स वीज लागेल. त्याचा खर्च सुमारे 200 ते 400 रुपयांपर्यंत येऊ शकतो.

एकदा चार्ज झाल्यानंतर ते 140 ते 170 किमी जाऊ शकते, असे पालिकेकडून सांगण्यात आले. वाहन चार्ज सुरू असताना चालक व सहप्रवासी येथील हॉलमध्ये आराम करू शकतात.

या ठिकाणी उपाहारगृह बांधण्यात आले असून गरम पेय, हलका नाश्ता करता येईल, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news