इंजिनिअरिंग डिप्लोमाचे प्रवेश सुरू; थेट व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदत

इंजिनिअरिंग डिप्लोमाचे प्रवेश सुरू; थेट व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदत

पुणे, पुढारी वृत्तसेवा: तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना येत्या 8 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
प्रवेशासाठी लागणारी कादगपत्रांची योग्य माहिती घेऊन अर्ज करण्याचे आवाहन डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. बारावीची परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विषय घेऊन उत्तीर्ण होणार्‍या; तसेच आयटीआय उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करायची असल्यास, त्याचा पर्याय देण्यात आला आहे.

कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य होत नसल्यास, अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या 'पॉलिटेक्निक'मध्ये सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. या सुविधा केंद्रांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना तारीख व वेळ ठरवून दिली जाईल. त्यानुसार अर्ज निश्चिती करावी लागेल.

डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणीच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे 31 मार्च 2023 पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रमाणपत्र सादर करू न शकणार्‍या विद्यार्थ्यांना राखीव जागांवर दावा करता येणार नाही, असे देखील डॉ. वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

आरटीईची दुसरी फेरी सोमवारपासून

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशाच्या अद्यापही 27 हजार 551 जागा रिक्तच आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सोमवारपासून दुसरी फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

यंदा राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 1 हजार 906 जागांसाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यातील नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून 1 लाख 16 हजार 289 विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन राहिलेल्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्यापही 27 हजार 551 जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे.

असे आहे डिप्लोमा प्रवेशाचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 10 जून ते 8 जुलै
कागदपत्रांची पडताळणी : 10 जून ते 8 जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 11 जुलै
यादीवर विद्यार्थ्यांचे आक्षेप : 12 ते 14 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 15 जुलै

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news