‘जलजीवन’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी! शासनाचा निर्णय

‘जलजीवन’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी! शासनाचा निर्णय

नगर : पुढारी वृत्तसेवा:  जिल्हा परिषदेकडून राबविल्या जाणार्‍या जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांच्या कामांच्या तपासणीसाठी आता राज्य सरकारने त्रयस्थ समितीची नियुक्ती केली आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअयर्स लि. या कंपनीकडे तपासणीचे काम देण्यात आले आहे. ही समिती योजनांच्या कामांची पाहणी करून तसा अहवाल तयार करणार आहे. दरम्यान, या निर्णयाने 'जलजीवन'चा सुरू असलेल्या सावळा गोंधळ उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात जलजीवन मिशनमधून अनेक पाणी योजनांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातही 1005 गावांसाठी 900 पाणी योजनांचा आराखडा तयार झालेला आहे. अनेक कामेही सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी जलजीवनच्या कामांविषयी तक्रार आल्या. राज्यातही हीच परिस्थिती असल्याने शासनाने संबंधित पाणी योजनांच्या तपासणीसाठी एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लि. या कंपनीला तपासणीची जबाबदारी दिली आहे.

संबंधित संस्थेकडून जलजीवन मिशन अंतर्गत केल्या जाणार्‍या भौतिक कामांचे व्यावसायिक, विश्वसनीय व तांत्रिकदृष्ट्या अनुभवी त्रयस्थ संस्थांकडून निरीक्षण व प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्रयस्थ संस्थला 'तो' अधिकार
कामाच्या पाहणीवेळी संबंधित विभागीय अधिकारी, अभियंता, तसेच ठेकेदार हे आवश्यक त्या दस्तावेजासह उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. झेडपी अधिकार्‍यांना पूर्वसूचना न देता योजनांच्या कामांवर आकस्मिक भेटी देवून योजना तपासणी करण्याचा अधिकार त्रयस्थ संस्थेला बहाल करण्यात आला आहे, तसेच कार्यकारी अभियंता यांनी केलेली शेरेपूर्तता त्रयस्थ समितीला समाधानकारक वाटत नसेल, तर त्यावर अभिप्राय करून प्रकरणे निकाली काढण्याचा अधिकार त्यांना दिला आहे.

ग्रामस्थांच्या पंच म्हणून स्वाक्षर्‍या
त्रयस्थ संस्थेने योजनांची तपासणी करताना गावातील ग्रामस्थ, पाणी पुरवठा समितीचे सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या समक्ष तपासणी करावी, तपासणीवेळी उपस्थितांची स्वाक्षरी घेणे गरजेचे आहे. तपासणीची तारीख जिल्हा परिषदेतून ग्रामपंचायतीला कळविणे अभिप्रेत आहे.

'ते' ठेकेदार रडारवर
त्रयस्थ तपासणी दरम्यानच्या शेर्‍याची 'टीपीआयए' संस्थेने पडताळणी करावी, यात निरीक्षणाची पूर्तता नसेल, तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

काय काय होणार तपासणी?
त्रयस्थ समितीच्या वतीने पाणी योजनेचे काम करताना वापरलेले वाळूचे सिल्ट कंटेंट, काँक्रीट स्लंप टेस्ट, सिमेंट, खडी, विटा, वाळू, लोखंडी सळ्या यांच्या क्षेत्रीय भौतिक चाचण्यादेखील करण्यात येणार आहेत. त्या बाबतचा निरीक्षणांचा अहवालात अंतर्भाव केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news