आरोग्य विभागाच्या परीक्षेत रविवारी गोंधळ

आरोग्य विभागाच्या परीक्षेत रविवारी गोंधळ
Published on
Updated on

पुणे / नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : परीक्षेचे नियोजन झाले नाही, म्हणून तब्बल दोन वेळा पुढे ढकलून आणि शेवटच्या वेळी तब्बल महिनाभर मुदतवाढ देऊनही आरोग्य विभागाच्या परीक्षेत रविवारी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात तीन आणि नाशिकमधील दोन केंद्रांवरील उमेदवारांना या गोंधळामुळे मन:स्ताप सहन करावा लागला.

पुण्यातील कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस, चिंचवडच्या गीतामाता इंग्लिश मीडियम स्कूल येथे सकाळच्या सत्रात व कर्वेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज येथे दुपारच्या सत्रात प्रश्‍नपत्रिका वेळेत मिळाल्या नाहीत. पर्यवेक्षकही वेळेवर न पोहचल्याने उमेदवारांना उशिरा प्रश्‍नपत्रिका मिळाल्या. नाशिकच्या गिरणारे केंद्रावरील 192 परीक्षार्थींना वेळेवर प्रश्‍नपत्रिका मिळाली नाही, तर केटीएचएम

केंद्रावर वेगळ्या विषयाच्या प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याने परीक्षार्थींनी नाराजी व्यक्‍त केली. या गोंधळामुळे अनेकांनी परीक्षाच दिली नाही, तर काहींना वेळ वाढवून देण्यात आल्याने त्यांनी परीक्षा दिली.

आरोग्य विभागाची गट 'क'ची पुण्यात सकाळ व दुपार अशी दोन सत्रांत लेखी परीक्षा झाली. परीक्षा घेण्याची जबाबदारी 'न्यासा कम्युनिकेशन' या कंपनीला दिली होती. मात्र पहिल्यापासूनच या कंपनीचे ढिसाळ नियोजन उमेदवारांच्या मुळाशी आले. सकाळी 10 वाजता 123 केंद्रांवर लेखी परीक्षेला सुरुवात झाली. पण कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार कॉलेजमधील परीक्षार्थींना प्रश्‍नपत्रिका वेळेवर मिळाली नाही. तब्बल एक तास उशिराने प्रश्‍नपत्रिका मिळाली. तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षेची वेळ झाली तरीही तेथे बैठक व्यवस्था नसणे या समस्येचाही सामना करावा लागला.

चिंचवड येथील गीतामाता इंग्लिश मीडियम स्कूल या केंद्रावरही परीक्षेला बसणार्‍या अनेक उमेदवारांना जवळपास तासभर उशिराने प्रश्‍नपत्रिका मिळाली, तर कर्वेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या केंद्रावर दुपारच्या सत्रात 3 वाजता पेपरची वेळ असताना त्यांना पावणेचार वाजता पेपर देण्यात आला.

साडेपाच वाजेपर्यंत त्यांना वेळ वाढवून देण्यात आली. पंधरा मिनिटे लवकर पेपर घेतल्याचे येथील उमेदवारांनी सांगितले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करून चप्पल, शूज काही न घालता परीक्षेला बसण्यास सांगितले होते, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली होती.

ज्या उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका मिळण्यास उशीर झाला, त्यापैकी काही उमेदवारांना वेळ वाढवून मिळाली, तर काहींना एकच तास परीक्षा देता आली. पुरेसा वेळ न मिळालेल्या काही ठिकाणी परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. दरम्यान, ज्यांना उशिरा पेपर मिळाले त्यांना तीन तास पेपर लिहिण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याने व तसा वेळ काही ठिकाणी दिल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news