सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : अकलूज, माळेवाडी ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत, नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. राज्य शासन याबाबत निर्णय घेत नसल्याने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून साकडे घालण्यात आले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात त्यांनीच पुढाकार घेऊन तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
अकलूजला नगरपालिका, तर नातेपुते येथे नगरपंचायत करण्याचा वाद हा गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून या संदर्भातील निर्णय होत नसल्याची तक्रार
आता अकलूजकरांनी केली आहे. यासाठी अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर महिनाभरापासून चक्री उपोषण सुरु होते.
या उपोषण स्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर या भाजपच्या नेत्यांनी भेट देऊन या मागणीला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, या मागणीसाठी मुंबईत राजभवन येथे कोशियारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, या ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे प्राबल्य आहे.
लोकसंख्येच्या निकषानुसार या ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायती होणे गरजेचे आहे. परंतु महाविकास आघाडीचे सरकार राजकीय सूडबुद्धीने हा निर्णय रोखून धरत आहे. त्यासाठी राज्यपालांनीच पुढाकार घेऊनच निर्णयाचा आदेश काढावा.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नातेपुतेचे उपसरपंच अतुल पाटील, मामा पांढरे, माळेवाडी अकलूज ग्रामपंचायतीचे जालिंदर फुले उपस्थित होते. राज्यपाल या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अकलूज, नातेपुते आणि माळेवाडी येथे नगरपालिका, नगरपंचायती व्हाव्यात यासाठी जनरेटा सुरू आहे. त्याअंर्गत गेल्या महिन्याभरापासून उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनाला राज्यभरातील सर्वच नेत्यांनी भेटीही दिल्या; पण अद्याप निर्णय झालेला नाही. आज आंदोलनाचा 31 वा दिवस होता.