पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal Record : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या लढतीत भारतीय संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या बॅटने अनेक विक्रम रचले जाऊ शकतात. या 22 वर्षीय डावखु-या फलंदाजाच्या बॅटमधून मालिकेत धावांचा पाऊस पडत आहे. त्याने मालिकेत आतापर्यंत 2 द्विशतके झळकावली आहेत. त्याने विझाग (विशाखापट्टणम) कसोटी सामन्यात 209 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 214 धावा फटकावल्या. यशस्वी ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो पुढील सामन्यात 5 ऐतिहासिक विक्रम मोडू शकतो.
1. गावसकरांचा विक्रम मोडीत निघणार?
यशस्वी पुढील सामन्यात सुनील गावसकर यांचा 53 वर्ष जुना विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे. गावसकर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत खळबळ उडवून दिली होती. त्यांनी 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत विक्रमी 774 धावा (एका द्विशतकासह 4 शतके आणि तीन अर्धशतके) केल्या होत्या. त्यावेळी गावसकर यांची सरासरी 154.80 होती. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा हा भारतीय विक्रम आहे. तर सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीने आतापर्यंत 8 डावांत 655 धावा केल्या आहेत. यशस्वीने उर्वरित 2 डावात 120 धावा केल्या तर तो द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल. (Yashasvi Jaiswal Record)
सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडीज (1971) : 4 सामने, 774 धावा, 154.80 सरासरी, 4 शतके
सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (1978-79) : 6 सामने, 732 धावा, 91.50 सरासरी, 4 शतके
विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2014-15) : 4 सामने, 692 धावा, 86.50 सरासरी, 4 शतके
विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (2016) : 5 सामने, 655 धावा, 109.16 सरासरी, 2 शतके
दिलीप सरदेसाई विरुद्ध वेस्ट इंडीज (1971) : 5 सामने, 642 धावा, 80.25 सरासरी, 3 शतके
यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड (2024) : 4* सामने, 655* धावा, 93.57 सरासरी, 2 शतके
यशस्वीकडे पुढील सामन्यात 1 धावा करून विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. वास्तविक, इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 655 धावा करणारा कोहली पहिला भारतीय आहे. यशस्वीने या बाबतीत त्याची बरोबरी केली आहे. आता तो 1 धाव काढताच कोहलीचा हा विक्रम मोडेल. (Yashasvi Jaiswal Record)
यशस्वी आणि विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2 शतके झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तसेच सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यासह आणखी 11 भारतीयांचा या यादीत समावेश आहे. तर मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविड हे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक 3 शतके ठोकण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहेत. द्रविडने दोनदा अशी कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत पुढील कसोटीत 2 शतके झळकावून सर्वांना मागे सोडण्याची सुवर्णसंधी यशस्वीकडे आहे.
यशस्वीने या मालिकेतील 4 सामन्यात एकूण 23 षटकार ठोकले आहेत. अशाप्रकारे तो धर्मशालेत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय ठरला आहे. एकूणच यशस्वी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 34 षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू विवियन रिचर्डसनच्या नावावर आहे. अशा परिस्थितीत यशस्वीला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
कसोटी सामन्यांमध्ये यशस्वीने आतापर्यंत 15 डावांमध्ये 69.35 च्या सरासरीने 971 धावा केल्या आहेत. जर त्याने या सामन्यात 29 धावा केल्या तर तो सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय ठरेल. या बाबतीत तो चेतेश्वर पुजाराला मागे टाकेल. पुजाराने 18 डावात एक हजार कसोटी धावा केल्या होत्या. सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणा-या भारतीय फलंदाजांच्या यादीत विनोद कांबळी (14 डाव) अव्वलस्थानी आहे.