आयपीएलमध्‍ये ‘सुसाट’, WTC मध्‍ये ‘भुईसपाट’…फलंदाजांची हाराकिरी भोवली

आयपीएलमध्‍ये ‘सुसाट’, WTC मध्‍ये ‘भुईसपाट’…फलंदाजांची हाराकिरी भोवली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपल्‍या नावावर करण्‍याचे स्‍वप्‍न सलग दुसर्‍यांदा भंगले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्‍या अंतिम सामन्‍यात टीम इंडियाने एकदम सुमार कामगिरी केले असे नाही. गोलंदाजांची कामगिरी प्रभावी राहिली मात्र दिग्‍गज फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. नुकत्‍याच झालेल्‍या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल ) स्‍पर्धेत दमदार कामगिरी करणारे फलंदाजांनी अंतिम सामन्‍यात नांगी टाकली आणि कोट्यवधी क्रिकेटप्रेमीच्‍या निराशेच्‍या खाईत लोटले गेले. टीम इंडियाने २०१३ मध्‍ये शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. आयसीसीच्या नऊ स्पर्धांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. चार वेळा अंतिम फेरीत पराभवाची नामुष्‍की टीम इंडियाने अनुभवली आहे. (WTC FINAL 2023 Ind vs Aus)

टीम इंडियाने जेव्‍हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारली तेव्‍हाचा विजेतेपदाची अपेक्षा पूर्वीपेक्षा जास्त होती. यावेळी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. भारतीय फलंदाज यावेळी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवतील असे वाटत होते, पण त्यांना पुन्हा अंतिम अडथळा पार करता आला नाही आणि अंतिम सामन्‍यात २०९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

WTC FINAL 2023 : चारही महत्त्‍वाच्‍या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी अत्‍यंत सुमार कामगिरी केली. दिग्‍गज चारपैकी एकाही फलंदाजाला दोन्ही डावात अर्धशतक करता आले नाही. याची मोठी किंमत संघाला मोजावी लागली. रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत अपयशी ठरले. कसोटीतील सर्वोत्‍कृष्‍ट फलंदाज असे बिरुद मिरविणार्‍या चेतेश्वर पुजाराही स्‍मरणीय कामगिरी करु शकला नाही. भारतीय क्रिकेटचे भविष्‍य अशी आपली ओळख निर्माण करण्‍यात यशर्‍स्वी ठरलेला शुबमन गिल यानेही देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची निराशा केली.

कर्णधार रोहितचा बेजबाबदार फटका

अंतिम सामन्‍यातील पहिल्‍या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एलबीडब्ल्यू केले होते. त्याला २६ चेंडूत केवळ १५ धावा करता आल्या. यापूर्वीही आयसीसी चषकांच्‍या चार फायनलमध्ये (2007, 2013, 2014, 2017) एकदाही अर्धशतक झळकावता आले नव्हते. यानंतर दुसऱ्या डावात त्याने चांगली सुरुवात केली, मात्र 43 धावा करून तो बाद झाला. नॅथन लायनला स्वीप मारण्‍याचा मोह त्‍याला आवरता आला नाही. या बेजबाबदार फटक्‍यामुळे त्‍याने स्‍वत:ची विकेट गमावली.

WTC FINAL 2023 Ind vs Aus : शुभमन गिलची सुमार कामगिरी

भारतीय क्रिकेटचा नवा स्टार शुबमन गिलला पहिल्या डावात स्कॉट बोलँडने क्लीन बोल्ड केले. शुभमनला चेंडू सोडायचा होता; पण बोलँडचा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त स्विंग होऊन यष्‍टीवर आदळला. शुभमनने पहिल्‍या डावात १५ चेंडूत १३ धावा केल्या. दुसऱ्या डावातही त्याला स्कॉट बोलँडने आपला बळी बनवले. तो स्कॉटचा चांगला बचाव करू शकला नाही. चेंडू बॅटला लागला आणि कॅमेरून ग्रीनकडे गेला त्याने शानदार झेल घेतला. मात्र, त्याच्या झेलवरून वाद निर्माण झाला, पण यामुळे शुभमनची सुमार कामगिरी झाकली जात नाही.

WTC FINAL 2023 Ind vs Aus : विराटकडून पुन्‍हा अपेक्षाभंग

विराट कोहलीला पहिल्या डावात मिचेल स्टार्कचा चेंडू खेळण्यात अपयश आले. स्टार्कचा अचानक बाऊन्स कोहलीच्या अंगठ्याला लागला आणि तो स्लिपमध्ये गेला. तिथे स्टीव्ह स्मिथने उडी मारून अप्रतिम झेल घेतला. दुसऱ्या डावात विराट त्याच्या चुकीने बाद झाला. त्याने बोलँडचा बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू बॅटला लागला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे गेला. कोहलीने चुकीचा फटका खेळून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा भंग केल्या.

पुजाराचा 'अप्‍पर कट' अनाकलनीय

अनुभवी फलंदाज पुजारा गेल्या दोन महिन्यांपासून इंग्लंडमध्ये होता. तो ससेक्स क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळत होता. ससेक्ससाठी त्याने दोन महिन्यांत तीन शतके झळकावली होती, मात्र या सामन्यात त्याला त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचा फायदा उठवता आला नाही. पहिल्या डावात कॅमेरून ग्रीनचा एक चेंडू त्याच्या विकेटकडे गेला. पुजाराला ते सोडायचे होते, पण चेंडू स्विंग होऊन विकेट्समधून गेला. पुजाराने २५ चेंडूत १४ धावा केल्या. पुजाराने ज्या पद्धतीने चेंडू सोडला, त्यावरून त्याला त्याचा ऑफ स्टंप माहीत नसल्याचे दिसत होते. हे कोणत्याही क्लबच्या खेळाडूंसोबत घडते. दुसऱ्या डावात पुजाराने सर्वांनाच चकित केले. तो कसोटीत कधीही अप्पर कट शॉट मारत नाही आणि तो दुसऱ्या डावातही त्याने केला. पुजारा २७ धावा करून बाद झाला.

नुकत्‍याच झालेल्‍या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल ) स्‍पर्धेत दमदार कामगिरी करणारे फलंदाजांनी WTC  अंतिम सामन्‍यात नांगी टाकली. त्‍यांच्‍या निराशाजनक प्रदर्शनामुळे कोट्यवधी क्रिकेटप्रेमी निराशेच्‍या खाईत लोटले गेले. टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अंतिम सामन्‍यात फलंदाजांनी आपली कामगिरी थोडी उंचावली असती तर भारताची कसोटी विश्‍वविजेता बनण्‍याचे स्‍वप्‍नपूर्ती झाली असती. मात्र आयपीएलमध्‍ये उत्‍कृष्‍ट कामगिरी करणारे फलंदाजांचे अपयशावर आता चर्चा होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news