WTC Final : टीम इंडियाचा पुन्‍हा 'स्‍वप्‍नभंग'..! ऑस्‍ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन | पुढारी

WTC Final : टीम इंडियाचा पुन्‍हा 'स्‍वप्‍नभंग'..! ऑस्‍ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधलेल्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्‍ट्रेलियाने दिमाखात आपल्‍या नावावर केला. सलग दुसर्‍यांदा कसोटी विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारणार्‍या टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चषक पटकविण्‍याचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा भंगले आहे.ऑस्‍ट्रेलियाने अंतिम सामना २०९ धावांनी जिंकत कसोटी विश्‍वचषक आपल्‍या नावावर केला आहे. भारताचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्‍टात आला. ( WTC Ind vs Aus Final day ) दुसर्‍या डावात टीम इंडियाच्‍या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. विराट काेहलीने सर्वाधिक ४९ धावा केल्‍या. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने २७० धावांवर दुसरा डाव घोषित करत भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा दुसरा डाव २३४ धावांत आटोपला.

ऑस्‍ट्रेलियन गाेलंदाजांचा भेदक मारा, टीम इंडियाच्‍या फलंदाजांची हाराकिरी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चषक पटकविण्‍यासाठी दुसर्‍या डावात भारताला ४४४ धावांची गरज होती. पाचव्‍या दिवशाची सुरुवात खराब झाली. सातव्‍या षटकात स्‍कॉट बोलँडने भारताला दोन धक्‍के दिले. विराट ४९ धावांवर झेलबाद झाला. यानंतर आलेला रविंद्र जडेजाही दुसर्‍या चेंडूवर शून्‍य धावांवर तंबूत परतला. यानंतर अजिंक्‍य रहाणे याने श्रीकर भरतच्‍या मदतीने डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. टीम इंडियाने २०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. मात्र स्‍टार्कने अजिंक्‍य आणि श्रीकरची जोडी फोडली. त्‍याने ४६ धावांवर खेळणार्‍या अजिंक्‍याला कॅरीकरवी झेलबाद केले.

यानंतरच्‍या षटकात नेथन लायनने शार्दुल ठाकूरला शून्‍यवर एलबीडब्ल्यू आऊट करत भारताला सातवा धक्‍का दिला. यानंतर स्‍टार्कने कॅरीकरवी उमेश यादवला झेलबाद केले. संयमाने फलंदाजी करणार्‍या २३ धावांवर खेळत असलेल्‍या श्रीकर भरतला नेथन लायनने तंबूत धाडले. अखेर नेथन लायनने सिराजला तंबूत धाडत  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपल्‍या नावावर केली.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button