नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या तक्रारींत वाढ होत असताना स्वत:चे आरोग्य राखण्या कडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. विशेषत: पोस्ट कोविडनंतर आरोग्याबाबत समाजात अधिक सजगता निर्माण झाली आहे. देशातील २५ टक्के जनता दरवर्षी नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेत असल्याची बाब एका आरोग्यविषयक अहवालातून समोर आली आहे.
रविवारी (दि.७) जागतिक स्तरावर आरोग्य दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या वर्षी "माझे आरोग्य, माझा हक्क आहे!" ही थीम अंतिम केली आहे. जागतिक स्तरावर आरोग्याबाबत जागरुकता वाढविण्यासह सार्वजनिक आरोग्य आव्हानाकडे लक्ष वेधत त्या मध्ये महत्वपूर्ण बदल करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. याचनुषंगाने विचार केल्यास मागील तीन ते चार वर्षामध्ये आरोग्याच्या काळजी घेण्याबद्दल जनतेमध्ये जागृती वाढली आहे. त्यामध्येही भारतातील हे प्रमाण १० ते १२ टक्यांहून वाढून २५ टक्यांपर्यंत पोहचले आहे. त्याचे प्रमुख कारणे म्हणजे नागरीकांमध्ये वाढलेली सजगता म्हणता येईल.
पोस्ट कोविडनंतर जनतेमध्ये हद्य, मुत्रपिंड, श्वासोश्वास तसेच मानसिक आजारात काहीअंक्षी वाढ झाली आहे. त्यासोबत मधुमेह, बीपी, वाढते ताणतणाव असेही आजार बळावत आहे. या आजारांचे वेळीच निदान झाल्यास त्याची तीव्रता कमी करणे किंवा कायमस्वरुपी त्यावर मात करणे शक्य असते. या दृष्टीकोनामधून नियमित आरोग्य तपासणीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. स्वत:ची आरोग्य तपासणीसह कुटूंबांच्या आरोग्य सांभाळण्याकडे लक्ष दिले जात आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून बघितल्यास जनतेत नियमित आरोग्य तपासणीचे वाढते प्रमाण हे आशादायक असले तरी भविष्याच्या दृष्टीने त्यात अधिक वाढ होणे गरजेचे आहे.
निसर्गाने कोविडच्या माध्यमातून जगाला आरोग्य जपण्याचा संदेश दिला आहे. धावपळीच्या जीवनात मधूमेह, ताणतणावा यासारख्या आजारात वाढ होत आहे. या आजारांपासून स्वत:ला दुर ठेवण्यासाठी युवकांनी नियमित व्यायामासोबत व्यसनापासून दुर राहिले पाहिजे. साठ वर्षावरील ज्येष्ठांनी वर्षातून एकदा तरी आरोग्याची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. –डाॅ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक.
अशी घ्यावी काळजी
-वयाची साठी पार केलेल्या ज्येष्ठांनी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे.
-युवकांनी व्यसनापासून दुर राहतानाच दररोज व्यायामासाठी वेळ द्यावा
-आरोग्यविषयक तक्रारी किंवा थकवा जाणवत असल्यास वेळेवर तपासणी करावी
-सर्वच वयोगटातील जनतेने जंकफुडपासून स्वत:ला दुर ठेवत सकस आहार घ्यावा
-उत्तम आरोग्य हेच सुखी व आनंदी जीवनाची खरी गुरुकिल्ली
हेही वाचा: