नोकरी करणारी हवी की गृहिणी? नव्‍या सर्वेक्षणात लग्‍नाळूंच्‍या पसंतीचा झाला खुलासा

नोकरी करणारी हवी की गृहिणी? नव्‍या सर्वेक्षणात लग्‍नाळूंच्‍या पसंतीचा झाला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तरुण-तरुणींच्‍या जीवनातील सर्वात महत्त्‍वाच्‍या निर्णयापैकी एक म्‍हणून विवाहाकडे पाहिले जाते. योग्‍य जोडीदार मिळाला तर वैवाहिक जीवन आनंददायी ठरते. त्‍यामुळेच लग्‍नाळू तरुण व तरुणींच्‍या आपल्‍या भावी जोडीदारांकडून अनेक अपेक्षा असतात. Shaadi.com ने 'इंडियाज मोस्ट एलिजिबल' सर्वेक्षणातून लग्‍नाळू तरुण-तरुणींच्‍या आपल्‍या भावी जोडीदाराबाबत असणार्‍या अपेक्षांबाबत खुलासा झाला आहे. (Working women and marriage )

आधुनिक काळात कौटुंबिक नातेसंबंधात बदल होत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम आपल्‍या विवाहसंस्‍थेवर झाला आहे. मागील काही वर्षांमध्‍ये जोडीदारविषयक असणार्‍या अपेक्षांमध्‍ये वाढ झालेली दिसते. लग्‍नासाठी इच्‍छूक असणारे महानगरांमधील तरुण-तरुणी डेटिंगच्‍या टप्‍प्‍यातून जातात तर बहुतांश जण आपला भावी जोडीदार शोधण्‍यासाठी वैवाहिक साईटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. विवाहइच्छूक तरुण-तरुणींनी दिलेल्‍या माहितीचा आधार घेवून Shaadi.com ने तरुण-तरुणींमध्‍ये आपल्‍या भावी जोडीदारामध्‍ये कोणते गुण असावेत? यावर सर्वेक्षण केले.

विवाहइच्‍छूकांचा व्‍यवसाय, वय, उत्‍पन्‍न आणि स्‍थान यांचा विचार 'शादी डॉट कॉम'ने या सर्वेक्षणात केला आहे. तसेच
काश्‍मीर ते कन्‍याकुमारी आणि आसाम ते अहमदाबाद अशा देशातील निम्‍मशहरी भाग आणि ग्रामीण भागातील लग्‍नाळूंच्‍या अपेक्षांचा या सर्वेक्षणात समावेश करण्‍यात आला आहे. १ डिसेंबर २०२१ आणि ३१ डिसेंबर २०२२ दरम्‍यान सक्रियपणे Shaadi.com वापरणार्‍या सुमारे २५ लाख जणांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. यामध्‍ये १६ लाख पुरुष तर ९ लाख महिलांचा समावेश होता.

सर्वेक्षणातील निष्‍कर्ष …

Working women and marriage :  सरकारी नोकरीचा दबदबा आजही कायम

जोडीदाराला सरकारी नोकरी असावी, ही अपेक्षा आजही तरुणींमध्‍ये कायम आहे. देशात सरकारी नोकरी असणार्‍या तरुणांना जोडीदार म्‍हणून सर्वाधिक मागणी आहे. लग्‍नासाठी सरकारी नोकरी असणार्‍या तरुणांना सर्वाधिक प्राधान्‍य मिळते. त्‍याचबरोबर आयटी क्षेत्रात काम करणांना पुरुषांनाही प्राधान्‍य आहे. महिलांमध्‍ये हवाई सेवा क्षेत्र आणि आर्किटेक्ट तरुणींना सर्वाधिक मागणी आहे. कृषी क्षेत्रात काम करणार्‍या तरुण-तरुणींना सर्वात कमी पसंती असल्‍याचे या सर्वेक्षणात नोंदवले गेले.

पुरुषाचे वाढते वय लग्‍नासाठी ठरतोय मुख्‍य अडसर

पुरुषांचे वाढते वय हे लग्‍न ठरण्‍यासाठी आता मुख्‍य अडसर ठरत असल्‍याचे या सर्वेक्षणात स्‍पष्‍ट झाले आहे. ३४ ते ३५ वर्षांपुढील पुरुषांचे विवाह जमणे हा मोठा प्रश्‍न झाला आहे. विशेष म्‍हणजे शादी डॉट कॉमवर साडेसहा हजारपेक्षा अधिक सदस्‍य हे ६०वर्षांपेक्षा अधिक आहेत. ते दुसर्‍यांदा बाहुल्‍यावर चढण्‍यास उत्‍सुक आहेत. गेल्‍या एका दशकामध्‍ये विवाहाचे सरासरी वय दोन वर्षांनी वाढले आहे. पुरुषांचे वय अडीच वर्षांनी तर महिलांचे विवाहाचे सरासरी वय एक वर्षांनी वाढल्‍याचे या सर्वेक्षणात नमूद करण्‍यात आले आहे.

नोकरी करणार्‍या तरुणींना प्राधान्‍य

विवाहासाठी इच्‍छूक तरुण व तरुणींना आपलं आर्थिक स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाचे वाटते. त्‍यामुळेच अलिकडे पुरुष कमवती जोडीदाराला प्राधान्‍य देताना दिसतात. यापूर्वी  गृहिणी होण्‍यास इच्‍छूक असणार्‍या तरुणींना तरुण लग्‍नासाठी पसंद करतात,असा समज होता. मात्र या सर्वेक्षणात नोकरी करणार्‍या तरुणींना लग्‍नासाठी सर्वाधिक प्राधान्‍य मिळताना दिसते. या सर्वेक्षणात नोकरी करणार्‍या जोडीदाराला पुरुषांनी सर्वाधिक प्राधान्‍य दिल्‍याचे दिसले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news